ठाणे – मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वेची प्रवासी संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अनेकदा गर्दीमुळे अपघात होऊन प्रवाशांचे प्राण जात असतात. मात्र, लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये फलाटाचे विस्तारिकरणासह अनेक कामे केली जाणार आहेत. दरम्यान आसनगाव रेल्वे स्थानकात विविध कामे सुरू असून ही कामे २०२६ मध्ये पुर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. जलद तसेच धिम्या लोकल गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. रोजचा रेल्वे प्रवास काही प्रमाणात सुखकर व्हावा या उद्देशाने प्रशासन विविध उपयायोजना राबवत असते. दरम्यान, ठाण्या पलीकडील कर्जत आणि कसारा पर्यंतच्या स्थानकांत विविध कामे सुरू करण्यात आली आहेत.
आसनगाव हे शहापूर तालुक्यातील महत्वाचे स्थानक आहे. आसनगाव स्थानकातून सुमारे ७५ हजार प्रवाशी प्रवास करतात. मागील पाच वर्षापूर्वी आसनगाव स्थानकाची हरित स्थानकात नोंद करण्यात आली. तसेच कल्याण -कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने आसनगाव स्थानकात पोलीस स्थानकाची उभारणी व्हावी म्हणुन प्रशासनाकडे आठ वर्षे पाठपुरावा केला होता. यंदा आसनगाव येथे नवीन पोलिस स्थानक उभारण्यात आले असून ५८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करीत आहेत.
दरम्यान, आसनगाव स्थानकांत प्रशासनाच्यावतीने विविध कामे केली जात आहेत. मात्र, सुरू असलेली कामे संथगतीने होत असल्याच्या तक्रारी कल्याण- कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेकडे आल्या होत्या. त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली. यावेळी आसनगाव स्टेशन मास्तर सुहास मणियार, रेल्वेचे आयओडब्ल्यूचे वरिष्ठ विभाग अभियंता आशिष दुबे, तसेच कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव हे उपस्थित होते. ३१ मार्च २०२६ पर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे अधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान सांगितले.
आसनगाव स्थानकाचा होणार कायापालट
कल्याण -कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याने आसनगाव स्थानकाचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी एक मध्यवर्ती फलाट, एक होम फलाट असे एकूण दोन फलाट, पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १२ मीटर लांबीचा पूल, एक शौचालय आणि दोन्ही बाजूंना सरकते जिने, तसेच पश्चिमेला अभिनव विद्यालयापर्यंत रस्ता होणार आहे. ही सर्व कामे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, अशी माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
आसनगाव स्थानकात सुरू असणारी कामे ही लवकरात लवकर पुर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वेचे आयओडब्ल्यूचे वरिष्ठ विभाग अभियंता आशिष दुबे यांनी सांगितले.
