ठेकेदाराचे फलक हटविले, ‘लोकसत्ता ठाणे’ मधील वृत्ताची दखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर पूर्व व पश्चिम भागात पादचारी, रेल्वे प्रवासी आदींच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला स्कायवॉक गेल्या काही दिवसांपासून अडगळ व भंगाराच्या साहित्याने भरला होता. येथील अस्वच्छता वाढीस लागली असतानाच या स्कायवॉकवर जाहिरात करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने येथे आपले जाहिरात फलक, ते लावण्यासाठीच्या शिडय़ा, गंजलेले लोखंडी डबे ठेवले होते. त्यामुळे  नागरिकांना त्रास होत होता. ‘लोकसत्ता ठाणे’ने मंगळवारी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताच्या दणक्याने जागे झालेल्या प्रशासनाने हे सामान हटविण्यास तात्काळ सुरुवात केली आहे.

बदलापूर पूर्वेला असलेल्या स्कायवॉकवर जाहिरात ठेकेदाराने गेल्या काही महिन्यांपासून जुने फलक आणून ठेवले होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा येता-जाताना त्रास होत होता. तसेच स्कायवॉक अस्वच्छ असल्याने दरुगधीही पसरली होती. जाहिरातीचे फलक स्कायवॉकवर ठेवल्याने त्यातून अपघात घडण्याची शक्यताही होती. स्कायवॉकवरील फरश्या उखडलेल्या अवस्थेत आहेत. विजेचे दिवेदेखील काही ठिकाणी बंद होते. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. ठेकेदाराच्या या सामानामुळे स्कायवॉक ठेकेदाराला आंदण दिला काय असा संतप्त सवाल अनेक नागरिकांनी एमएमआरडीएकडे केला होता. अखेर याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये सविस्तर वृत्त प्रसारित होताच एमएमआरडीएने ठेकेदाराकडून स्कायवॉक तातडीने स्वच्छ करून घेतला आहे. त्यामुळे हा परिसर मोकळा झाला असून प्रवाशांच्या वाटेतील अडथळाही दूर झाला आहे. या स्कायवॉकवर तुटलेले बेंच, तुटलेल्या फरश्या यांची दुरुस्ती तसेच विजेच्या दिव्यांची दुरुस्ती करणेही आवश्यक असून सध्या ही दुरुस्तीची कामेही तात्काळ करण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least cleanness work of badlapur skywalk started
First published on: 06-01-2016 at 01:55 IST