Dahi Handi 2025: ठाणे : मुंबई सहित सर्व महापालिकांची हंडी आम्ही फोडणार आहोत, पूर्वी त्यातील लोणी काही विशिष्ट लोकांकडे जात होते. ते लोणी आता जनते पर्यंत नेण्याचे काम आम्ही करणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टेंभीनाका येथे टेंभीनाका मित्र मंडळाच्या माध्यमातून शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे तसेच विविध भागातून या हंडीनिमित्ताने गोविंदा पथके थर रचण्यासाठी येत असतात. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ही दही हंडी देशपातळी पर्यंत नेण्याचे काम केले. या दहीहंडी निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टेंभीनाका उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंद दिघे साहेबांची टेंभीनाक्याची ऐतिहासिक दहीहंडी आहे. दिघे साहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार कारभार चालविणारे आमचे एकनाथ शिंदे यांनी हा वारसा समर्थपणे चालविला आहे असे फडणवीस म्हणाले. मागच्या वर्षी आम्ही सत्तेची हंडी फोडली. आता यावर्षी मुंबई सहित सर्व महापालिकांची हंडी फोडणार आहोत, पूर्वी त्यातील लोणी काही विशिष्ट लोकांकडे जात होते. ते लोणी आता जनते पर्यंत नेण्याचे काम आम्ही करणार आहोत असे फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.