बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानेच हल्ला!

सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांचा आरोप

सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांचा आरोप

ठाणे :  शहरातील अनधिकृत बांधकामे आणि ढाबे यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई थांबावी म्हणूनच हा हल्ला झाल्याचा संशय ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी हा सूड उगवला आहे, परंतु आम्ही कर्तव्य बजावत राहू, असेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर एका फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या हाताची बोटे कापली गेली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये बदली झाल्यानंतर बाळकूम, कासारवडवली आणि वाघबीळ भागातील अनधिकृत इमारती आणि ढाब्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान गेल्या सोमवारी कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर घटनास्थळी गेले, त्यावेळी माझ्यावर हल्ला झाला. फेरीवाल्यांना हल्ला करायचा असता तर ज्यावेळी कारवाई झाली होती त्याचवेळी पथकावर हल्ला झाला असता. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि ढाबे यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली असून ही कारवाई थांबावी म्हणूच हा हल्ला झाला आहे, असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही या हल्ल्याला घाबरणार नाही, असेही सांगत त्यांनी बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना आव्हान दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Attack due to taken action on illegal constructions says tmc assistant commissioner kalpita pimple zws