डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत ठाकुरवाडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या. महसूल दस्तऐवजांमध्ये हेराफेरी केली. या बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणी करून त्यामधील सदनिका घर खरेदीदारांना विक्री केल्या. याप्रकरणी डोंबिवली महसूल विभागाने वरिष्ठांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात २२ भूमाफियांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात एका वकिलासह सहा माफियांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली आहेत. ही नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत या मागणीसाठी तक्रारदार विनोद जोशी यांनी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
बेमुदत उपोषणाचा शनिवारी पाचवा दिवस आहे. डोंबिवली पश्चिमेतील मौजे नवी डोंबिवलीतील ठाकुरवाडी गट क्रमांक २६-१४, २६-१५, २६-१६ या मिळकतींवर २९ भूमाफियांनी संगनमत करून पालिकेची बनावट कागदपत्रे, शिक्के, स्वाक्षऱ्या करून बांधकाम परवानगीची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे दोन बेकायदा इमारतींची उभारणी केली. या बेकायदा इमारतींची कागदपत्रे दस्त नोंदणीकृत करून या बेकायदा इमारतींमधील सदनिका भूमाफियांनी घर खरेदीदारांना या इमारती अधिकृत आहेत असे दाखवून विक्री केल्या.
या माध्यमातून शासन, पालिकेचा लाखो रूपयांचा महसूल माफियांनी बुडविला आणि घर खरेदीदारांची फसवणूक केली. या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार विनोद जोशी यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. पालिका अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे, बनावट सातबारा, फेरफार तयार करून त्यामध्ये वारस नसलेल्यांची नावे घुसवून या इमारतींची उभारणी केली असल्याचे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
डोंबिवली मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावरून उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या निर्देशावरून डोंबिवली महसूल मंडळाचे अधिकारी रवींद्र जमदारे यांनी महसूल विभागाचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यात हेराफेरी करणाऱ्यांवर २२ भूमाफियांविरुध्द विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
याप्रकरणात एक वकिलासह कृष्णा बाळाराम पाटील, चंद्रकांत पांडुरंग जोशी, तुषार पाटील, भूषण रमेश भोईर, जयसिंग पाटील, प्रमोद रमेश भोईर यांची नावे वगळल्याची जोशी यांची तक्रार आहे. ही नावे समाविष्ट करावीत म्हणून तक्रारदार जोशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पाठपुरावा केला. त्याची दखल घेतली नाही. जोशी यांनी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणात एक माजी नगरसेवक, एका माजी नगरसेवकाचा मुलगा यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर यापूर्वीच महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
याचिकाकर्ते हरेष म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेतील सरकारी, खासगी जमिनींवरील २४ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. यात पालिका, महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन महिन्यापूर्वी या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाने पालिकेला सूचित केले होते. पालिकेच्या ह प्रभागाने कोणतीही कारवाई केली नाही, असे जोशी यांनी सांगितले.