रूळ अंथरणाऱ्या वाहनातील बिघाडामुळे अपघात; एका कामगाराचा मृत्यू; दोन कामगार जखमी

बदलापूर : सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू होणार की नाही, याविषयीचे चर्चाद्वंद्व सुरू असतानाच सोमवारी मध्य रेल्वेची लोकल सेवा पाच तास विस्कळीत झाली. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ अंथरण्याचे काम करणाऱ्या वाहनातील बिघाडामुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. या घटनेनंतर बदलापूर ते कर्जतदरम्यानची लोकल सेवा सकाळी दहापर्यंत खंडित झाली होती.

ऐन सकाळी उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचा मोठा फटका नोकरदारवर्गाला बसला. लोकल सेवा बंद झाल्याने बदलापूर ते कर्जतदरम्यानच्या स्थानकांत प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. या वेळी करोनाविषयक अंतरनियमांचाही पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून आले. रेल्वे सेवा ठप्प असल्याने त्याचा भार रस्ते वाहतुकीवरही पाहायला मिळाला.

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मध्यरात्री २ वाजल्यापासून ‘टीआरटी’ यंत्रवाहनाच्या मदतीने रूळ बदलण्याचे व अंथरण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पहाटे तीनच्या सुमारास कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर स्लीपर टाकण्यात येत असताना वाहनात बिघाड होऊन १२ स्लीपरचा संच खाली कोसळला. या अपघातात राजू सानू झुगारे या ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर वासुदेव भावरू सिद्ध आणि गणेश किसन सिद्ध हे दोन कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या अपघातानंतर मुंबईहून कर्जतकडे जाणारा डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर बदलापूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूकही या काळात बंद होती. त्यामुळे बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. अत्यावश्यक सेवेत जाणारे हजारो प्रवासी बदलापूर स्थानकात अडकून पडले होते. सुरुवातीला योग्य माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अंबरनाथ स्थानकातून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा सुरू असल्याचे कळताच अनेक प्रवाशांनी बस स्थानक आणि रिक्षा थांब्यांकडे धाव घेतली. त्यामुळे बस स्थानकातील खासगी कर्मचाऱ्यांच्या रांगेत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचीही भर पडली. बस स्थानकात रांगेत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचीही भर पडली. बस स्थानकात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर बदलापूर रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर, उड्डाणपुलाजवळचा भागात वाहतूक कोंडी पहायला मिळाली. तर यावेळी प्रवाशांची झालेली कोंडी पाहून रिक्षा चालकांनीही अतिरिक्त भाडे आकारण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे अडचणीत प्रवाशांची लुट पहायला मिळाली. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने कल्याण बदलापूर मार्गावरची वाहतुकही संथगतीने सुरू होती. रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी कल्याण- डोंबिवली परिवहनसेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. रेल्वे अपघातामुळे बुधवारी कल्याण ते बदलापुर मार्गावर १० फेऱ्या सोडण्यात आल्या.

स्थानके तुडुंब

रेल्वे सेवा ठप्प झाल्याने बदलापूर स्थानकात तुफान गर्दी झाली होती. सव्वाआठच्या सुमारास एक लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा लोकल सेवा थांबवण्यात आली. साडेआठच्या सुमारास स्थानकात आलेल्या मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये स्थानकावरील प्रवाशांनी गर्दी केली. त्यामुळे शारीरिक अंतराचा फज्जा पाहायला मिळाला. मिळेल त्या मार्गाने प्रवाशांनी या एक्स्प्रेसमध्ये प्रवेश मिळवत होते. एक्स्प्रेस गच्च भरूनही स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी होती. साडेनऊच्या सुमारास डेक्कन एक्स्प्रेस बदलापूर स्थानकातून मुंबईसाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर ९ वाजून ४० मिनिटांनी पहिली लोकल सोडण्यात आली.

रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

रेल्वे वाहतूक बंद पडल्यामुळे मुंबईहून कल्याणमार्गे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी पुणे एक्सप्रेस, मुंबई-पुणे विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम विशेष, मुंबई- बेंगळूरु आणि मुंबई -कोल्हापूर विशेष या रेल्वेगाड्या दिवा-पनवेल – कर्जतमार्गे वळवण्यात आल्या.