सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती पालिकेचा कारभार;३९ अधिकाऱ्यांची आवश्यकता
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बदलापूर नगरपालिकेतील कामकाज कमालीचे मंदावले असून त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याची ओरड आता सुरू झाली आहे. शासकीय नियमानुसार अ वर्ग नगरपालिकेत ३९ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करणे आवश्यक आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार जेमतेम सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हाकला जात आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरड सुरू झाली असून लोकप्रतिनिधींमधील असंतोष वाढीस लागला आहे.
शहराच्या विकासाकरिता नगरपालिकेत आवश्यक मनुष्यबळ असायला हवे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अधिकारी हे शासकीय व्यवस्थेचा कणा असतात. त्यामुळे त्यांच्याशिवाय कारभार गतिमान होऊ शकत नाही. मात्र अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे बदलापूर पालिकेचा कारभार मंदावला असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
अधिकारी वर्गच नसल्याने अनेक कामांना मर्यादेपेक्षा अधिक वेळ लागतो, अशा तक्रारी नगरसेवक करू लागले आहेत. सध्या कार्यरत अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिकेत कार्यरत अधिकारी नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी करू लागले आहेत.
कुळगाव बदलापूर पालिकेत सध्या ३९ अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. यापैकी सहा अधिकारी सेवेत कार्यरत असले तरी अभियंता, लेखाधिकारी आणि इतर अधिकारी संवर्गात आणखी ३३ अधिकाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. अनेकदा एकाच अधिकाऱ्यावर प्रभारी भार दिल्याने त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण होत नाहीत, अशा तक्रारी आहेत.
एकूण अधिकाऱ्यांच्या संख्येपैकी निम्मी संख्या कर्मचाऱ्यांची असावी, असा आग्रह कर्मचारी संघटनेचा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांपैकीच काहींना पदोन्नती देऊन निम्म्या जागा भरण्यात याव्यात आणि उरलेल्या जागांवर शासनाने अधिकारी नेमावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेची आहे. या वादात नियुक्त्या रखडल्या आहेत, अशी चर्चा आहे.
जोपर्यंत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त
अनेकदा महत्त्वाचे अधिकारी वरिष्ठ पातळीवरच्या बैठकांना किंवा वरिष्ठांच्या भेटीसाठी बाहेर असतात. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडतात. इतकेच नाही तर या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा फटका नगरसेवकांनाही बसत असतो. तसेच मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बाबतही अशीच ओरड असते. मुख्याधिकारी पालिकेत भेटत नाहीत, अशा तक्रारी अनेक नागरिक करताना दिसतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur municipal council work affected due to shortage of manpower
First published on: 13-04-2016 at 05:18 IST