बदलापूर: होम फलाटाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेत असलेला पश्चिमेतील रिक्षा थांब्याचा अडथळा कुळगाव बदलापूर नगरपालिकेने शुक्रवारी हटवला. त्याविरुद्ध संतप्त रिक्षा चालकांनी शुक्रवारी बेमुदत संप पुकारला. हा संप शनिवारीही सुरूच आहे. त्यामुळे शनिवारी सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानक ते रमेशवाडी, बदलापूर गावातून येजा करणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागली. रिक्षा थांब्याचा अडथळा नसतानाही तो हटवल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक येथे होम फलाटाची निर्मिती केली जाते आहे. मात्र जागा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून फलाटाचे काम करता येत नव्हते. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने बाजारपेठ परिसरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. त्यासोबतच होम फलाटासाठी आवश्यक स्कायवॉक खालील जागाही पालिकेने मोकळी केली. त्यासाठी रिक्षा थांब्याची जागा मोकळी करण्यासाठी तेथील छत पाडले. तर रिक्षा थांब्याच्या जागेला संरक्षक पत्र लावले. याविरुद्ध संतापलेल्या रिक्षा चालकांनी शुक्रवारी सांयकाळी बेमुदत संप पुकारला.

हेही वाचा: ठाणे जिल्ह्याची हवा खराब; गुणवत्ता निर्देशांक घातक पातळीवर, मुंबईत किंचित सुधारणा

शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला हा संप शनिवारी सकाळीही सुरू होता. त्यामुळे बदलापूर गाव, सोनिवली, रमेशवाडी या भागातून स्थानकात ये जा करणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागली. सकाळी रिक्षा चालक मोठ्या संख्येने स्थानक परिसरात जमले होते. रिक्षा चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आमच्या जागेचा कोणताही अडसर नसताना ही कारवाई केली गेल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. पालिका आणि रिक्षा चालकांच्या असमन्वयाचा फटका मात्र प्रवाशांना बसला.

हेही वाचा: आदित्य, उध्दव ठाकरे यांना सावरकरांचा इतिहासच माहिती नाही; डोंबिवलीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षाचालकांची अरेरावी
दरम्यान, संप असताना प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इतर रिक्षा चालकांना, जीप चालकांना संपात सहभागी असलेले रिक्षाचालक विरोध करताना दिसत होते. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण पसरले आहे.