बदलापूर रेल्वे स्थानकालगत पूर्व आणि पश्चिम भागात बांधलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने शहरातील नागरिकांना स्कायवॉकवरून चालताना गैरसोय होत आहे. याची दखल एमएमआरडीएने घेतली आहे. येत्या आठवडाभरात या स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे उपअभियंता एस. एच. टेंभुर्णीकर यांनी सांगितले.
स्कायवॉकचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यावरून चालताना ज्येष्ठ नागरिकांना अडचण होत आहेत, तर काही ठिकाणी पत्रेही उडाले आहेत. तसेच स्कायवॉकवर अजिबात स्वच्छता ठेवण्यात येत नसल्याने दरुगधीही पसरली आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या निर्देशानुसार उपअभियंत्यांनी भेट दिली असून आठवडय़ाभरात कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळगाव-बदलापूर पालिकेने एमएमआरडीएकडून या स्कायवॉकचा ताबा घेतल्यास त्यावर जाहिरातींची परवानगी देऊन पालिकेला उत्पन्न मिळू शकेल आणि स्कायवॉकची वारंवार देखरेख करता येईल; परंतु याबाबत पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिकेने त्याची अद्याप दखल घेतली नसल्याचे उपअभियंत्यांनी स्पष्ट केले.