टिटवाळ्याजवळील म्हसकळ येथील कल्याण जनता व ठाणे भारत सहकारी बँकांनी फुलवलेल्या वनराई प्रकल्पाचे जतन झाले पाहिजे. हा प्रकल्प या बँकांच्या ताब्यात राहिला पाहिजे, असे आपले मत आहे. वन विभागाने या बँकांकडून म्हसकळ येथील वनराई प्रकल्प काढून घेऊन बँकांच्या मेहनतीवर बोळा फिरवला आहे. यासाठी आपण स्वत: बँक संचालकांसह वन विभागाच्या प्रधान सचिवांची येत्या काही दिवसात भेट घेणार आहोत, अशी माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली.
म्हसकळ येथील ५० एकर जागेत कल्याण जनता सहकारी बँक व ठाणे भारत सहकारी बँकांनी फुलवलेला वनराई प्रकल्प हा देशातील सहकारी बँकांनी फुलवलेला एक आदर्शवत प्रकल्प आहे. या प्रकल्पाची राज्याच्या इतर भागात अंमलबजावणी होण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होण्याऐवजी कराराचे निमित्त पुढे करून बँकांकडून हा प्रकल्प वन विभागाने काढून घेतला. हे चुकीचे आहे, असे मतही केळकर यांनी मांडले. वनराई फुलविणाऱ्या संस्थांना राज्य सरकारकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असेल तर पुढील काळात कोणीही वन विभागाचे प्रकल्प चालवण्यासाठी पुढे येणार नाही. संस्था, लोकांमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व वाढवण्यासाठी असे वनराई प्रकल्प नियमांमध्ये शिथिलता आणून पुढे चालू ठेवण्यासाठी दिले पाहिजेत, असे मत आमदार केळकर यांनी व्यक्त केले. महिनाभर विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने वन विभागाच्या सचिवांशी आपल्याला कल्याण जनता व ठाणे भारत सहकारी बँकांचा विषय काढता आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2015 रोजी प्रकाशित
बँक संचालकांची वन सचिवांशी लवकरच चर्चा
टिटवाळ्याजवळील म्हसकळ येथील कल्याण जनता व ठाणे भारत सहकारी बँकांनी फुलवलेल्या वनराई प्रकल्पाचे जतन झाले पाहिजे.
First published on: 15-04-2015 at 12:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank director will discuss with forest secretary