दहा दिवसांत पाणीसाठय़ात २५ टक्क्यांची वाढ

बदलापूर : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बारवी धरणात तब्बल २५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे बारवी धरण ७४ टक्के भरले असून येत्या काही दिवसांत असाच पाऊस राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठय़ासाठी बारवी धरण महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत बारवी धरण उशिरा येणाऱ्या पावसामुळे बऱ्यापैकी रिकामे होत असल्याचे दिसून आले आहे. बारवी धरण जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवडय़ांमध्ये भरणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बारवी धरण भरण्यास ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडू लागला आहे. गेल्या वर्षी बारवी धरणात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अवघे ४७ टक्के भरले होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बारवी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून त्यामुळे बारवी धरण २९ जुलैपर्यंत ७४ टक्के क्षमतेने भरले आहे. दहा दिवसांपूर्वी २० जुलै रोजी बारवी धरणात १६९.३० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता, तर पाण्याची पातळी ६५.०२ मीटर होती. त्यामुळे धरणात अवघा ५० टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बारवीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे दहा दिवसांत बारवी धरणात तब्बल ८४.४३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी ६९.०२ मीटरवर पोहोचली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barvi dam water 74 water storage in barvi dam zws
First published on: 30-07-2021 at 04:02 IST