भागधारकांच्या सहकार आयुक्तांकडील तक्रारीनंतर बॅसीन कॅथोलिक बँकेचा निर्णय

तिसरे अपत्य झाले म्हणून बॅसीन कॅथोलिक बँकेच्या एका स्वीकृत संचालकाचे पद रद्द करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. वेलेरियन रॉड्रिक्स यांची बॅसीन कॅथोलिक बँकेच्या संचालक मंडळाने स्वीकृत संचालकपदी नियुक्ती केली होती. परंतु त्याला बँकेच्या भागधारकाने आव्हान देत सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती.

वेलेरियन रॉड्रिक्स यांची बॅसीन कॅथोलिक २२ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या सभेत स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र सरकारी अधिनियम १९६०च्या कलम ७३ अ (१) (७) अन्वये २००१ नुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असणारी व्यक्ती संचालकपदी राहू शकत नाही. या कायद्याचा आधार घेत बँकेचे भागधारक अ‍ॅड. जिमी घोन्साल्विस आणि नोएल वाझ यांनी सहकार आयमुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची तब्बल आठ वेळा सुनावणी झाली होती. सहकार आयमुक्तांनी बँकेकडून खुलासाही मागवला होता. अखेर सहकार आयुक्तांनी बँकेची बाजू ऐकून रॉड्रिक्स यांना अपात्र करण्याचे आदेश काढले आहेत. बँकेच्या पुढील संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपेपर्यंत रॉड्रिक्स यांना अपात्र घोषित करण्यात आल्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि विशेष निबंधक सुनील पवार यांनी या आदेशात म्हटले आहे. सहकार क्षेत्रातील स्वीकृत नगरसेवक अपात्र होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा अ‍ॅड. घोन्साल्विस यांनी केला आहे.

सर्व संचालकांना बडतर्फ करण्यासाठी दावा दाखल

तिसरे अपत्य असणारी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही किंवा त्याची स्वीकृत म्हणून निवड होऊ  शकत नाही, तरीही बँकेच्या संचालक मंडळाने रॉड्रिक्स यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे सर्व २१ संचालकांनाही बडतर्फ करावे, अशी मागणी अ‍ॅड. घोन्साल्विस यांनी केली आहे.

मला अद्याप आदेशाची प्रत मिळालेली नाही. परंतु सहकार आयमुक्तांनी दिलेला निर्णय मान्य आहे. मी हा निर्णय येण्याआधीच राजीनामा दिलेला आहे. मी घटनेचा आदर करतो. माझी कुणाविरोधात तक्रार नाही आणि नाराजीही नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-वेलेरियन रॉड्रिक्स, अपात्र ठरवलेले स्वीकृत संचालक, बॅसीन कॅथोलिक बँक.