टिटवाळ्याजवळील म्हसकळ पंचक्रोशीतील वनविभागाच्या सुमारे पन्नास एकर क्षेत्रफळाच्या विस्तीर्ण अशा जमिनीवर कल्याणमधील कल्याण जनता सहकारी बँक व ठाण्यातील ठाणे भारत सहकारी बँकांच्या व्यवस्थापनांनी ५० लाख रुपये खर्च करून वनराई फुलवली आहे. गेल्या सात वर्षांपासून या दोन्ही बँकांचे संचालक, कर्मचारी सामाजिक संस्थांच्या मदतीने ही वनराई समृद्ध करण्यासाठी झटत आहेत. या वनराईतून एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी या बँकांनी प्रयत्न चालवले असतानाच राज्याच्या वनविभागाने या दोन्ही बँकांना वनराई सांभाळण्यासाठी केलेल्या कराराची मुदत वाढविण्यास चक्क नकार दिला आहे. बँकांनी फुलवलेल्या जंगलाचा वनविभागाने ताबा घेतल्यानंतर काही दिवसांतच येथे वृक्षतोड आणि वणवा लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
शासकीय पडीक वनजमिनींचे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वनीकरण करण्याच्या वनविभागाच्याच धोरणाला साथ देत कल्याण जनता सहकारी बँक, ठाणे भारत सहकारी बँकांच्या व्यवस्थापनांनी पुढाकार घेतला. त्यानुसार टिटवाळ्याजवळील म्हसकळ पंचक्रोशीतील प्रत्येकी २५ एकर जमीन या दोन्ही बँकांना सात वर्षांच्या कराराने देण्यात आली. या दोन्ही बँकांनी त्यांच्या नफ्यातील एक टक्का रक्कम या प्रकल्पासाठी खर्च केली. बँकेचे संचालक, कर्मचारी त्याचबरोबर अडीच हजारांहून अधिक सामाजिक संस्था, शाळा यांच्या माध्यमातून पन्नास एकर जमिनीवर विविध प्रकारची २० हजारांहून अधिक रोपे लावली. या रोपांचे जंगल तयार केले. काळू नदीच्या काठी ही जमीन असल्याने नदीचे पाणी या वनराईसाठी वापरण्यात आले. या जंगलाच्या संरक्षणासाठी स्थानिक ग्रामस्थांना नेमण्यात आले. या भागातील महिलांना गवत काढणी, झाडांच्या फांद्या छाटणे व इतर कामे करण्यासाठी रोजगार देण्यात आला. २० ते २५ आदिवासी बांधव या प्रकल्पात काम करीत होते. त्यामुळे गेल्या सात वर्षांत हा परिसर निसर्गसमृद्ध झाला आहे. या ठिकाणी एखादे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीही या बँकांचे प्रयत्न सुरू     
होते. मात्र, सात वर्षांचा करार संपताच या बँकांना मुदतवाढ देण्यास वनविभागाने नकार दिला.
मुदतवाढ मिळण्यासाठी बँकांच्या संचालकांनी केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, यापैकी कोणीच त्यांच्या प्रस्तावाकडे गांभीर्याने पाहिले नाही. उलट ‘गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या वनविभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सामाजिक संस्थांच्या कोणत्याही करारास मुदतवाढ द्यायची नाही,’ असे ठरले असल्याने तुमचा करार वाढवता येणार नाही, असे या बँकांना कळवण्यात आले. तसेच ही वनराई ताब्यात घेण्याचे आदेशही ठाणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांनी उपवनसंरक्षकांना दिले. बँकांनी या संरक्षित वनाचा ताबा सोडताच या भागातील काही स्थानिक नागरिकांनी जंगलाची तोड सुरू केली आहे. गेल्या सात वर्षांत कधीही न लागलेला वणवा या भागात पेटू लागला असून वनराईचा मोठा भाग जळून खाक झाला आहे, अशी माहिती पुढे येत आहे.
भगवान मंडलिक, कल्याण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘म्हसकळचा वनराई प्रकल्प हा आम्हा बँकांच्या कुटुंबातील घटकाप्रमाणे आम्ही सांभाळत होतो. या मानवनिर्मित जंगलाचे नैसर्गिक जंगल करायचे. या ठिकाणी पर्यटन, रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असे अनेक आखाडे बांधण्यात आले होते. प्रकल्पाला वनविभागाकडून मुदतवाढ मिळाली नाही. वनराई आता आमच्या ताब्यात राहिली नाही. लोकांनी तोड सुरू केलीय. वणवे लागतात. याचे वाईट वाटते’’
– वामनराव साठे,
संचालक, कल्याण जनता सहकारी बँक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat cooperative banks in thane spent rs 50 lakh for conserved forest
First published on: 28-03-2015 at 12:25 IST