भरत म्हणजे भक्ती. भक्ती, रती आणि तन्मयता यांच्यातून तयार झालेले नृत्य म्हणजे भरतनाटय़म्. भरतनाटय़म् ही एक साधना आहे. अनेकजण नृत्याकडे करमणूक म्हणून पाहतात. मात्र भरतनाटय़म हे मनोरंजन नसून एक प्रकारचा अभ्यास आणि साधना आहे, असे मत ज्येष्ठ भरतनाटय़म प्रशिक्षक दीपक मुजुमदार यांनी व्यक्त केले. अभिनेत्री हेमामालिनी यांना भरतनाटय़म्चे प्रशिक्षण देण्याची आठवणही या वेळी मुजुमदार यांनी सांगितली.
के. शोभना संस्थापित नालंदा भरतनाटय़म् नृत्य निकेतनच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये ‘भाषा भरतनाटय़म्’ची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भक्ती, कलाप्रेमी व मनापासून साधना केली तर कलेच्या माध्यमातील दैवत्व सापडायला वेळ लागत नाही. शंकर म्हणजे नटराज, विष्णू म्हणजे मोहिनी, कृष्ण म्हणजे नटवर ही देवाची रूपे आहेत. सरस्वती देवीची वीणा आणि गणेशाचे मृदंग वादन या दैवी रूपांची साधना आजही सुरू आहे. नृत्याची ही संस्कृती मुलांना लहानपणापासूनच शिकवली पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये नृत्य हा विषय शिकवला जावा. नृत्यामध्ये शिक्षण घेणे हे मनोरंजन मानू नये तर या कलेला शिक्षणाचा दर्जा देऊन त्याची साधना केली पाहिजे, असा सल्ला मुजुमदार यांनी उपस्थित शिष्यांना दिला. कलेवर प्रेम असलेल्या हेमा मालिनी यांच्यासारखी शिष्या आपणास मिळाली हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हेमा मालिनी यांनी भरतनाटय़म्ची साधना आजही सुरू ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नालंदा भरतनाटय़म नृत्य निकेतनच्या वतीने सिंधुताई सकपाळ यांच्या संस्थेला मदतनिधी देण्यात आला.
कार्यक्रमामध्ये भाव, राग, ताल आणि नाटय़ यांचा एकत्रित आविष्कार असलेला भरतनाटय़ममधील गणेशवंदना, पुष्पांजली, गणपती कौतकम यांनी कार्यक्रमात रंग भरला होता. भाषा भरतनाटय़मची या सदरात भरतनाटय़्म एक परिपूर्ण कलाकार कसे घडवते हे रसिकांना जाणून घेता आले. यासाठी भरतनाटय़मच्या नृत्यवर्गाचे प्रतिरूप सादर करण्यात आले. तसेच या नृत्याविष्काराचे विविध रूपांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अलारीपू, नाटय़डोम, अडौ, श्लोक, शिरोभेदम हे प्रकार दाखवण्यात आले. तसेच नृत्यातील सहजता येण्यासाठीचे मार्गदर्शन रोहिणी खोल्लम यांनी करून दिले. कृष्णाच्या बाललीला सादर करण्याबरोबरच मुंबई मेरी जान या सदरातून हिंदी गाण्यावरील भरतनाटय़मचे कौशल्य रसिकांना पाहायला मिळाले. या वेळी विशाखा सुभेदार, श्रद्धा रानडे, कोरिओग्राफर मेधा संपत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.