अधिकाऱ्यांना दोन दिवसांत कोणता अहवाल सादर करावा लागणार
ठाणे : गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभुमीवर भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी बुधवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात गणेशमुर्ती आणि कृत्रीम तलावांसंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कृत्रीम तलावांची संख्या आणि ठिकाणे निश्चित करुन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचा सूचना देण्याबरोबरच पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांनी बुधवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीस उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षिरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये त्यांनी जनहित याचिका क्र.९६/२०२४ वर उच्च न्यायालयाचे आदेश तसेच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करावयाच्या कारवाईबाबत आढावा घेतला. या मार्गदर्शन सुचनांमध्ये गणेशमुर्ती पर्यावरण पुरक असाव्यात, तसेच त्यांचे विसर्जन कृत्रीम तलावात करावे असे निर्देशत केले आहे. तसेच शहरातील गणेश मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करुन देण्याबाबातच्या कार्यवाहीचा देखील आढावा घेतला.
दोन दिवसात उपायुक्तांकडे अहवाल सादर करा
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या सूचनांनुसार गणेश घाटांजवळ कृत्रीम तलाव उभारुन, त्या तलावांमध्ये गणेश मुर्तीचे विसर्जनाची सोय करावी असे आदेश आयुक्त सागर यांनी पर्यावरण आणि बांधकाम विभागास दिले. तसेच उच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या सुचनेनुसार नागरिकांमध्ये जनजागृती करुन त्यांना कृत्रीम तलावामध्ये गणेशमूर्ती विसर्जनास प्रोत्साहीत करावे असे निर्देश त्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागात उभारावयाच्या कृत्रीम तलावांची संख्या आणि ठिकाणे निश्चित करुन दोन दिवसात उपायुक्तांकडे अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांना आवाहन
गणेश आगमन आणि विसर्जन रस्त्याची दुरुस्ती, त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यावरण विभागामार्फत निर्माल्य एकत्रीत करुन त्याची शस्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, असे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील नागरीकांनी देखील उच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या सुचनांचे पालन करुन जास्तीत जास्त पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रीम तलावातच करावे असे आवाहन त्यांनी केले.