gold rate today : ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत असताना, आता या दागिन्यांवर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाणे जिल्ह्यात सोन्याचे दागिने दाखविल्यास त्याबदल्यात रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीनचे बक्षीस मिळेल असे सांगून भिवंडीतील काही महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडीतील रामनगर भागात फसवणूक झालेल्या महिला राहतात. यातील पाच महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबरला एक महिला त्यांच्या भागात भांडी विक्रीसाठी आली होती. तुमचे दागिने मला दिल्यास ते कंपनीत नेते. त्याचे छायाचित्र काढून झाल्यानंतर दागिने परत दिले जातील. तसेच त्याबदल्यात कंपनीकडून बक्षिस देखील मिळेल अशी बतावणी त्या महिलेने केली. त्यावेळी एका महिलेने तिच्या बोटातील चांदीची अंगठी महिलेला दिली.
दोन दिवसांनी ती महिला पुन्हा त्याठिकाणी आली. तिने महिलेला तिची चांदीची अंगठी परत केली. तसेच तिला बक्षीस म्हणून एक स्टीलचा डबा दिला. भांडी विक्री करणाऱ्या महिलेने त्या महिलेकडून तिचे पैंजण मागितले. महिलेने पैंजण काढून दिले. भांडी विक्री करणारी महिला ते पैंजण घेऊन गेली. महिलेने तिला मिळालेल्या बक्षिसाची माहिती परिसरातील इतर महिलांना दिली. सर्व महिला गप्पा मारत असताना काहीवेळाने भांडी विक्री करणारी महिला परत आली. तिने ते पैंजण महिलेला परत केले. तसेच पुन्हा एकदा स्टिलचा डबा दिला बक्षिस म्हणून महिलेला दिला.
दोनवेळा बक्षिस मिळाल्याने इतर महिलांनाही तिच्यावर विश्वास बसला. त्या महिलेने आता आमचे विशेष मोहीम सुरु असून सोने-चांदीचे दागिने दिल्यास वाॅशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, शिलाई यंत्र किंवा रोख रक्कम दिली जाईल अशी बतावणी केली. त्यामुळे महिलांनी त्यांच्याकडील सोने- चांदीचे दागिने महिलेला दिले. तिने पुन्हा परतण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी उशीर झाल्यानंतरही महिला परतली नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी तिचा सर्वत्र शोध सुरु केला. परंतु तिचा शोध लागू शकला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी एकत्र येऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चौकट या सर्व महिलांनी एकत्रित १८ ग्रॅम वनजाचे सोन्याचे दागिने आणि १६४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने दिले. सोने आणि चांदीच्या दागिन्यांची किंमत वाढल्याने आता फसवणूक करणाऱ्यांच्या टोळी सक्रीय झाल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.