भिवंडीतील माणकोली परिसरातील ११ गोदामांमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. गोदामांमध्ये प्लास्टिक, कागद यासारखा माल असल्याने आग वेगाने पसरत आहे. आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
माणकोली परिसरातील गोदामांमध्ये बुधवारी सकाळी आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग वेगाने पसरत गेली आणि ११ गोदामे आगीच्या विळख्यात सापडली. आगीचे वृत्त समजताच भिवंडीतील अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे रौद्र रुप पाहता कल्याण- डोंबिवली आणि ठाणे येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. गोदामात प्लास्टिकचे साहित्य आणि कागद मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग पसरत गेली असे समजते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही गोदामांना कुलूप असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. या आगीमुळे भिवंडीतील गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढत असून या गोदामांमध्ये अग्निशमन दलाचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. विशेष म्हणजे यातील काही गोदामांमध्य केमिकल्सचा साठा देखील केला जातो. त्यामुळे गोदामांबाबत प्रशासन कठोर पावले कधी उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.