ठाणे : भिवंडी येथे मेट्रो मार्गिका निर्माण कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने एका प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता शहरातील धोकादायकरित्या मेट्रो मार्गिकेच्या सुरु असलेल्या कामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. मागील तीन महिन्यांत मेट्रो मार्गिकाच्या कामा दरम्यानातील ही तिसरी दुर्घटना होती. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीव धोक्यात असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डोक्यावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचा धोका आणि रस्त्यावर खड्ड्यांचा त्रास अशा दुहेरी संकटात वाहन चालक सापडले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे आणि भिवंडी शहरात मेट्रो मार्गिकांच्या निर्माणाची कामे सुरू आहे. ही कामे एमएमआरडीएने काही कंपन्यांना कंत्राट स्वरुपात दिली आहे. या कामांविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. मेट्रो चार आणि पाच या दोन्ही मेट्रो मार्गिका उन्नत असल्याने त्याखालून वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
भिवंडी येथे मंगळवारी २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात मेट्रो मार्गिकेसाठी लागणारी लोखंडी सळई डोक्यात शिरल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. यापूर्वी घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामा दरम्यान ३० जुलैला मोटारीवर लोखंडी सळई पडली. या घटनेत वाहन चालक थोडक्यात बचावला. याच भागात २ मे या दिवशी देखील असाच प्रकार उघड झाला होता. एका मोटारीवर क्रेनचा भाग कोसळला. तसेच कॅडबरी जंक्शन येथेही काही वर्षांपूर्वी एका महिलेच्या अंगावर मेट्रो मार्गिकेच्या खोदकामासाठी रस्त्यालगत उभा केलेला लोखंडी पत्रा कोसळून तिचा मृत्यू झाला होता. वारंवार दुर्घटना घडत असतानाही प्रशासन केवळ दंडात्मक कारवाई करत आहे.
वाहन चालक, प्रवाशांनी या घटनांचा धसका घेतला आहे. मेट्रो मार्गिकाची कामे सुरु असताना अनेक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना नसल्याचे चालकांनी सांगितले. तर रस्त्यावर खड्डे पडले असताना आता डोक्यावरही मेट्रो कामाच्या धोक्याची कुऱ्हाड असल्याची भिती प्रवाशांनी व्यक्त केली.
चौकट
घोडबंदर मार्ग आणि भिवंडी येथील अंतर्गत तसेच मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो चार) मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. तर भिवंडीत ठाणे- भिवंडी-कल्याण (मेट्रो पाच) मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेसाठी एमएमआरडीएने ठिकठिकाणी खोदकामे केली. त्यामुळे येथील रस्ते वाहतुकीसाठी अरुंद झाले आहेत. तसेच पावसाळ्यात मुख्य तसेच सेवा रस्त्यांवर खड्डे पडल्याने दररोज वाहतुक कोंडी होत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांना धोकादायकरित्या रस्त्यावरील खड्डे चुकवून प्रवास करावा लागतो. तर भिवंडीत शहरातही ज्याठिकाणी मेट्रो मार्गिकेची कामे सुरु आहेत. तेथे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीवघेणा प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.