ठाणे : वाढदिवस, पद नियुक्ती तसेच इतर कार्यक्रमांचे पोस्टर्स, बॅनर्स विनापरवाना सर्वत्र लावून शहर विद्रुप करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाकडून असे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात येते. मात्र, या कारवाईनंतरही शहरात अशाप्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येत आहे. त्यामुळे असे पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्याबरोबरच पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा भिवंडी पालिका प्रशासनाने दिला आहे.
मुंबई महानगरातील सर्वच शहरांप्रमाणे भिवंडी शहरातही वाढदिवस, पद नियुक्ती तसेच इतर कार्यक्रमांचे पोस्टर्स, बॅनर्स विनापरवाना सर्वत्र लावून शहर विद्रुप करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी आथा पाऊले उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. पालिकेच्या पथकांकडून अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत मागील आठ दिवसांत १८२ अनाधिकृत बॅनर हटविण्यात आले आहेत.
विशेष मोहिम घेण्याचे कारण
सार्वजनिक जागेचा बेकायदेशीर वापर थांबवा, महानगरपालिका हद्दीतील मुख्य रस्ते, चौक, उड्डाणपूल, सार्वजनिक उद्याने आणि वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत फलक, बॅनर, पोस्टर यांची वाढती संख्या ही शहराच्या स्वच्छतेला आणि सौंदर्याला बाधा पोहोचवत आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरात साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि दृष्यप्रदूषण निर्माण होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यापुढे गुन्हा दाखल होणार शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मागील आठ दिवसांत १८२ अनाधिकृत बॅनर हटविण्यात आले आहेत. हि कारवाई यापुढे कायमस्वरुपी चालु ठेवण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
पालिकेचे आवाहन
कोणत्याही प्रकारचे बॅनर, फलक, पोस्टर महानगरपालिकेची परवानगी न घेता लावले असल्यास ते त्वरित हटविण्यात येतील. संबंधित जबाबदार व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांच्यावर महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियान, शहर सौंदर्याकरण, आणि वाहतूक सुरळीततेसाठी ही कारवाई अत्यावश्यक आहे. नागरिकांनी अशा अनधिकृत जाहिरात साहित्याची माहिती आपल्या विभागीय कार्यालयात कळवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.