ठाणे : भिवंडी महापालिकेचा कोणताही करवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्याकडे सादर केला. १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजना या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालमत्ता करातून चांगले उत्पन्न निर्माण करणे, जीआयएस भौगोलिक माहितीच्या आधारावर सर्वेक्षण करून कर महसूल उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच आकाशचिन्ह परवाना जाहिरात शुल्क नूतनीकरण, परवाना उत्पादनवाढीसाठी सर्वेक्षण करून जाहिरातीच्या जागांची संख्या वाढवून उत्पन्नात वाढ केली जाणार आहे.

महापालिकेच्या आरक्षित जागेवर खासगी सहभागातून विकास करणे, महाराष्ट्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नागरी पायाभूत व सामाजिक सुविधा निर्माण करणे व त्याच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १९ रस्त्यांचे रूपांतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यात करण्यासाठी ६५३ कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. विकास शुल्कातून आरक्षण क्रमांक ११ येथे खासगी सहभागातून बाजार आणि वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.

मीनाताई ठाकरे नाटय़गृहास शासनाकडून १० कोटी रुपये अनुदान निधी मंजूर झाला असून शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर या निधीमधून नाटय़गृहाची सुधारणा करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बाधणी करण्यासाठी १० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे, वराला तलाव, भादवड तलाव संवर्धन व सुशोभीकरण काय हे कामदेखील शासनाच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे. मलनिस्सारण प्रकल्प केंद्र, भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक दोन यामध्ये वेगवेगळय़ा मलनिस्सारण व्यासाच्या वाहिन्यांकरिता ३२५ कोटी ८९ लाख देयक अदा करण्यात आले आहे.

शहरातील भुयारी गटार योजना पूर्ण करणे, पालिका कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे अशी तरतूदही अर्तसंकल्पात करण्यात आलेले आहेत. राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी वाढीव झालेला खर्च, सिमेंट काँक्रीटचे २३ रस्ते दुरुस्ती, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, शहरातील १३ स्मशानभूमी, कब्रस्तानाची दुरुस्ती करणे, प्रत्येक प्रभाग समितीनिहाय सिमेंट काँक्रीट गटार तयार करणे या अर्थसंकल्पात आहे.

पथदिव्यांसाठी १ कोटी ८० लाखांची तरतूद

रस्त्यांवरील प्रकाशदिव्याअंतर्गत शहरात सोलर पॅनल, सोलर दिवे आणि एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत अंजुर फाटा ते धामणकर नाका रस्त्यावरील पथदिवे एमएमआरडीएमार्फत काढण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नव्याने पथदिवे एमएमआरडीएमार्फत बांधण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपये उपलब्ध करून काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

पाणी योजनेसाठी ३८५ कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात शहर पाणीपुरवठा योजनेवर भर देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शहरासाठी शंभर दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ३८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासोबतच जलकुंभही सुरू करण्यात येणार असून यासाठी १.१३ कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्यावर भर

शहर टीबी मुक्त करणे, लसीकरण प्रमाण वाढवणे, खाटांचे सामूहिक आरोग्य केंद्र सुरू करणे, बालकातील कुपोषण कमी करणे, माता मृत्यू बालमृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत १५ नागरी आरोग्य केंद्रामार्फत तसेच पाच नवीन कार्यान्वित होणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत बाह्य रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi municipal corporation budget without tax increase akp
First published on: 24-02-2022 at 00:01 IST