नियोजित प्रकल्पांच्या उभारणीकडे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणप्रेमी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळय़ाचे चार क्षण घालवता यावेत आणि त्यासोबतच जैवविविधतेचेही संवर्धन व्हावे, या हेतूने कळवा खाडीजवळ उभारण्यात आलेले निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान सध्या अडगळीत पडल्यासारखे चित्र आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी खुल्या करण्यात आलेल्या या उद्यानात वाचनालय, ध्यानधारणा केंद्र, खडक उद्यान उभारण्याची घोषण करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प अद्याप साकारण्यात आलेला नाही. त्यातच या उद्यानात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना खाडीतील पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत असल्याने सुरुवातीला या ठिकाणी होणारी गर्दीही आता आटली आहे.

कळवा पुलालगतच स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान शासनाच्या वन विभागाच्या अंतर्गत तयार करण्यात आले आहे. ठाणे वन परिक्षेत्राच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत या उद्यान प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. सात कोटींचा निधी खर्च करून पर्यटकांसाठी हे प्रशस्त जैवविविधता केंद्र उभारण्यात आले आहे. कळवा पुलाशेजारी साकेत मैदान परिसरापर्यंत असलेल्या या उद्यानात स्थानिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. नवग्रहांचे प्रतिनिधित्व करणारे वृक्ष, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड, फुलपाखरू उद्यान असे वेगवेगळे प्रकल्प या उद्यानात राबवण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या उद्यानात पर्यटक चांगली हजेरी लावत असत. मात्र, आता ती रोडावली आहे. फिरण्यासाठी कळवा खाडीचा अडथळा निर्माण होत असल्याचे एक कारण यासाठी दिले जात असून या उद्यानाची म्हणावी तशी प्रसिद्धी करण्यातही प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आलेले नाही. या उद्यानात २२५ चौरस फूट क्षेत्रावर वाचनालयाची उभारणी करण्यात येणार होती. वन्यजीव, पर्यावरण, कांदळवन, स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, सामाजिक वनीकरणाची माहितीपत्रके अशा माहितीचा संग्रह ई-बुक्सच्या माध्यमातून वाचनालयात ठेवण्यात येणार होता. त्याचे काम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा वनअधिकाऱ्यांनीही उद्यानात फिरताना पर्यटकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य  केले. ‘पर्यटकांकडून किमान प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे,’ असे वन अधिकारी किशोर ठाकरे यांनी सांगितले.

अडथळय़ांची वाट

ही खाडी किनारी भटकंती पर्यटकांना आकर्षण असली तरी या ठिकाणाहून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठी पूलाची आवश्यकता आहे. खाडीतून फिरणे कठीण असल्याने या ठिकाणाहूनच पर्यटक परत फिरत असल्याने संपूर्ण उद्यान पाहता येणे शक्य होत नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biodiversity park in poor conditions
First published on: 13-01-2018 at 03:29 IST