|| नितीन बोंबाडे / निखिल मेस्त्री
माकप-कष्टकरी संघटनेचे मनोमीलन आघाडीसाठी फायद्याचे:- डहाणू मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात असले तरी विद्यमान आमदार पास्कल धनारे विरुद्ध महाआघाडी पुरस्कृत उमेदवार विनोद निकोले अशी रंगतदार लढत होत आहे. मात्र गेली अनेक वर्षे या भागात पाय रोवून काम करणाऱ्या कष्टकरी संघटनेबरोबरचा संघर्ष माकपने समन्वयाने संपुष्टात आणल्यामुळे माकप उमेदवाराला मोठे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराने युतीच्या उमेदवारापेक्षा घेतलेले मताधिक्य कायम ठेवण्यासाठी आघाडीचे सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना या मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी मते मिळाल्याने आधीच युती उमेदवाराच्या गोटात धाकधूक होती, त्यामध्ये माकप व कष्टकरी एकत्र आल्याने अधिकच वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत युतीचा उमेदवार मागे पडल्यानंतर आमदार पास्कल धनारे यांनी अखेरच्या दोन महिन्यांत आपल्या मतदारसंघाकडे बारकाईने लक्ष दिले. तरीदेखील भाजपमधील काही घटकांचा त्यांना विरोध कायम राहिला. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागली नसली तरी नाराज मंडळींची नाराजी कायम आहे, असे सांगण्यात येते.
डहाणू मतदारसंघात डहाणू तालुक्यातील काही भाग आणि तलासरीतील काही भाग समाविष्ट आहे. तलासरी व डहाणू तालुक्यातील पूर्व भागात माकपचे प्राबल्य आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत माकपची मते काही प्रमाणात घटल्याचे दिसते. मात्र यापूर्वीच्या निवडणुकीतील आकडेवारीचा अभ्यास केला असता माकपची या भागात ४० ते ५५ हजार हक्काची मते असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांत माकपने वनहक्कासाठी दिलेला लढा त्याचबरोबरीने विविध स्थानिक प्रश्न घेऊन उभे केलेले संघर्ष, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग या प्रकल्पांविरोधात स्थानिकांच्या असंतोषाला दिलेले पाठबळ ही माकपची जमेची बाजू ठरू शकते.
कष्टकरी संघटना गेली अनेक वर्षे डहाणू तलासरीसह जव्हार, मोखाडा भागांत प्रामुख्याने आदिवासी व वंचित घटकांसाठी काम करत आहे. माकपच्या प्रभावक्षेत्रात कष्टकरी संघटनेने केलेला शिरकाव माकपला सहन होत नव्हता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या भागांत माकप व कष्टकरी यांच्यात अनेक संघर्ष पाहायला मिळाले. २०१४ नंतर राजकीय परिस्थिती बदलली. त्यातच भूमिपुत्रांना विश्वासात न घेता बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग आदी प्रकल्प उभे राहिले. वनाधिकार कायदा झाला, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन-तीन वर्षांत माकप व कष्टकरी संघटना यांची जवळीक वाढू लागली. त्यातूनच भूमी अधिकार आंदोलन या व्यासपीठाची निर्मिती झाली आणि कधी नव्हे ते दोघेही एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी तसेच या भागात लादल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे येथील समाज उद्ध्वस्त होईल हे पाहून या दोनही संघटना या निवडणुकीत एकत्रित आल्या आहेत.
या भागात भाजप वनवासी कल्याण आश्रम, अन्य संघटनांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून भाजपने या मतदारसंघात २०१४मध्ये पहिल्यांदाच कमळ फुलवले. मात्र गेल्या पाच वर्षांत आमदार पास्कल धनारे यांना या मतदारसंघात स्वत:चा प्रभाव निर्माण करता आला नाही, असे एकंदर चित्र आहे. इतकेच नव्हे तर पालकमंत्री साथीला असतानाही भाजपा या मतदारसंघात प्रभावी काम झाले नसल्याचे आरोप होत आहेत. असे असले तरी डहाणू नागरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. खासदार स्मृती इराणी, आमदार मनीषा चौधरी यांचा या भागात प्रभाव आहे. शिवाय भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यास दिवंगत खासदार चिंतामण वनगा व इतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत प्रयत्न केले आहेत. स्वत: आमदार पास्कल धनारे यांनी सुसज्ज कार्यालयाची उभारणी करून मतदारसंघातील नागरिकांची सोयीचे करण्यासाठी प्रयत्न केले असून आमदार निधीतून अनेक कामे केली आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी अलीकडेच भाजप प्रवेश केल्याने भाजपाची ताकद वाढली आहे.
असे असले तरी भाजपमध्ये अंतर्गत नाराजी कायम असून या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने प्रचारात सेनेचे पदाधिकारी अजूनही अपेक्षित प्रमाणात उतरले नाहीत. बोईसर येथे सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्या भाजप बंडखोराला भाजपचे स्थानिक पदाधिकारी उघडपणे मदत करत असल्याने व्यथित झालेल्या सेनेच्या वरिष्ठांनी डहाणू येथील सेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोईसरमध्ये प्रचारासाठी बोलाविले आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत कष्टकरी संघटनेने माकपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांना बळ मिळाले आहे. माकप व कष्टकरी संघटनेबरोबरीने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीची साथही मिळालेली असल्याने महाआघाडीने युतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. एकीकडे भातकापणीचा हंगाम सुरू असून अनेक रहिवासी मासेमारीकरिता बोटींवर किंवा कामाकरिता लगतच्या राज्यात जात असल्याने मतदान किती प्रमाणात होईल यावर भाजप व विद्यमान आमदार हे आव्हान कसे परतवून लावणार हे येणाऱ्या दिवसांत पाहावयास मिळणार आहे.
माकप आणि कष्टकरी संघटना ही एका ध्येयासाठी काम करणारी संघटना आहे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाशी पहिल्यांदा आघाडी झाली आहे. याचा चांगला परिणाम या निवडणुकांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाआघाडीला त्याचा चांगला फायदा होणार आहे.– विनोद निकोले, माकपचे उमेदवार
कष्टकरी संघटना आणि माकप संघटना एकत्र आल्या असल्या तरी महायुतीच्या विकासकामांच्या बळावर आमची कामे लोकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे आम्हीच निवडून येऊ. माकप व कष्टकरी संघटनांच्या एकत्र येण्याचा परिणाम निवडणुकांत दिसणारा नाही. – पास्कल धनारे, सध्याचे आमदार व भाजप उमेदवार