डोंबिवलीतील शक्तिप्रदर्शनाला मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांची साथ
नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असतानाच गुरुवारी डोंबिवली येथे समर्थकांच्या मेळाव्यासाठी आलेल्या राणे यांच्या शक्तिप्रदर्शनाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे बळ पुरविण्यात आल्याचे दिसून आले. भाजपचे स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे मूळचे कोकणातले आहेत. चव्हाण यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राणे यांच्या मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे फडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या कार्यकर्त्यांना वेळीच रोखण्यात आले.
राणे आपल्या समर्थकांचा स्वतंत्र्य गट अथवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ करतील असा कयास बांधला जात आहे. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी डोंबिवलीत समर्थकांच्या मेळव्यासाठी आलेल्या राणेंना भाजप कार्यकर्त्यांनी अगदी उघडपणे साथ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नारायण राणे हे शाहू सावंत प्रतिष्ठान आणि समर्थकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीत आले होते. हा कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील जिमखान्याच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त राणे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कल्याण-डोंबिवली शहरात कोकणातील विविध भागांतील रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य आहे. त्यामुळे रोड शो निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी राणे समर्थकांनी केली होती. मात्र, या शक्तिप्रदर्शनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे साथ दिल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत चव्हाण मतांची बेगमी करताना ‘कोकणी’ असल्याचा मुद्दा पद्धतशीरपणे प्रचारात आणत असतात. त्यामुळे राणे यांच्या ‘मदती’साठी चव्हाण समर्थकांना पाहून येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
जिमखाना मैदानातही भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात राणे यांच्याबरोबरीने काही कार्यकर्ते भाजपच्या विजयाच्या घोषणा देताना दिसले. यासंबंधी रवींद्र चव्हाण यांना वारंवार दूरध्वनी करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राणे यांनी कार्यक्रमात यासंबंधी थेट मतप्रदर्शन टाळल्याचे दिसून आले.
‘मराठा आरक्षणाशिवाय स्वस्थ बसणार नाही’
मराठय़ांना आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत. आता जे काही सुरू केले आहे त्याचेच हे प्रयोजन आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही, असे सांगत डोंबिवलीतील आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात नारायण राणे यांनी बुधवारी संध्याकाळी भाजप पक्षप्रवेशास अडथळा आणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसमधील खलबते, प्रसारमाध्यमे यांना टीकेचे लक्ष्य केले. १ ऑक्टोबर रोजी आपण आपल्या राजकारणाची पुढची दिशा ठरविणार आहोत. यापुढचा काळ केवळ राजकारणासाठी बांधून न ठेवता तो कोकणी माणूस, कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी असेल, असे त्यांनी जाहीर केले.