बदलापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठ्या वांगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटात फुट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेली ही ग्रामपंचायत अखेर भाजपच्या ताब्यात गेली आहे. शिंदे समर्थक एक गट भाजपसोबत आघाडीत सहभागी झाला होता. तर एका गटाने स्वतंत्रपणे आघाडी निवडणुकीत उतरवली होती. त्यामुळे भाजप – शिवसेना विरूद्ध शिवसेना असाच सामना रंगला. यात महाविकास आघाडी निष्प्रभ ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बदलापूरः बारवी प्रकल्पग्रस्तांना अखेर मिळाले नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र; प्रकल्पग्रस्त तरूणांना अभियंत्यांसह ‘या’ पदांवर संधी

बदलापूर शहरानंतर वेगाने नागरिकरण होत असलेल्या वांगणी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. रविवारी मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी अंबरनाथ तहसिल मुख्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. मतांची मोजणी काही तासाच पूर्ण होताच ग्रामपंयातीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना प्रणित आघाडीचा वरचष्णा दिसून आला. भाजप गटाच्या वनिता आढाव सरपंचपदी निवडून आल्या. तर एकूण १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत १३ जागांवर विजय मिळवत भाजप आणि बाळासाहेब शिवसेना गटाने ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला. ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली.

हेही वाचा >>> कल्याण: बडोदा बँकेचे बनावट संकेतस्थळ बनवून कल्याण मध्ये वकिलाची फसवणूक

भाजप आणि बाळासाहेब शिवसेना प्रणित आघाडीने ही निवडणूक जिंकली असली तरी शिवसेनेचे या ग्रामपंचायतीवरील वर्चस्व खालसा झाले आहे. यापूर्वी पाच वर्ष शिवसेनेच्या सरपंच विराजमान होत्या. राज्यात शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर वांगणी ग्रामपंचायत क्षेत्रातून बहुतांश शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र पक्षांतर्गत गटामुळे निवडणुकीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे शिंदे समर्थक आणि जुने जाणते शिवसैनिक एकनाथ शेलार यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्याशी आघाडी तयारी करून जागावाटप केले. पाच जागा पदरात पाडून शेलार यांनी १२ जागा आणि सरपंचपद भाजपासाठी सोडले. त्यामुळे बदलापूर शहरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने वांगणी शहर प्रमुखांना सोबत घेत थेट १७ जागांवर उमेदवार उभे करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे जिल्ह्यातल्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री यांच्या बाळासाहेब शिवसेना पक्षात फुट पडल्याचे दिसून आले. मतमोजणीनंतर दुसऱ्या गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित गटाला यश मिळाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी उडी घेतली होती. मात्र त्यानंतरही त्यांना यश मिळाले नाही. या विजयानंतर खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील खड्डे, खराब रस्त्यांनी प्रवासी हैराण; समाज माध्यमातून जनआंदोलनाची हाक

प्रतिक्रियाः राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे. त्याच युतीनुसार स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या नेतृ्त्वाखाली युतीच्या विचारांवर आम्ही निवडणूक लढवली. दुर्दैवाने शहरप्रमुख चर्चेसाठी आले नाहीत. पण शिवसेनेचा विजय झालेला आहे.

– एकनाथ शेलार, उपजिल्हाप्रमुख, बाळासाहेब शिवसेना.

प्रतिक्रियाः निवडून आलेले १२ सदस्य शिवसेनेचे आहेत. एकत्रित निवडणूक लढवली असती तर सरपंचही शिवसेनेचाच असता. मात्र दुसऱ्या गटाने चर्चा केली नाही. वांगणीत शिवसेनेचीच ताकद मोठी आहे.

– प्रसाद परब, शहरप्रमुख, बाळासाहेब शिवसेना. 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sarpanch wangani gram panchayat split shiv sena shinde faction mahavikas aghadi ineffective ysh
First published on: 17-10-2022 at 20:28 IST