एकीकडे शिंदे – फडणवीस साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है तर दुसरीकडे पन्नास खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा देत भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शनिवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमनेसामने आले होते. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने ठाणे शिवसेनेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात सरकार विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तर त्याचवेळी ठाणे भाजपा कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त मोदींनी केलेल्या विकासकामांच्या स्थानक परिसरातील फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला होता. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा >>> कणकवलीतील रहिवाशाची हत्या करणाऱ्या डोंबिवलीतील सराईत गुन्हेगाराला जन्मठेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाकडून देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती सांगणार मोठा फलक लावण्यात आला होता . त्याच्या अनावरणासाठी भाजपचे कार्यकर्ते स्थानक परिसरात जमले होते. तर वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या कोट्यावधींची गुंतवणूक असलेला आणि लाखो तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्याने सध्याच्या शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या वतीने सरकारच्या विरोधात स्थानक परिसरातच निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे स्थानक परिसराला काही काळ राजकीय आखाड्याचे रूप आले होते. पन्नास खोके एकदम ओके, खोके सरकारचा निषेध अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. तर देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, शिंदे – फडणवीस साहेब आगे बढोच्या घोषणा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची तसेच बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने स्थानक परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाला वाणिज्य महाविद्यालयाची परवानगी
स्वाक्षरी मोहिमेला संमिश्र प्रतिसाद
वेदांता समूहाचा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना ठाणेच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात स्थानक परिसरात निषेध स्वाक्षरी मोहीम शनिवारी राबविण्यात आली. सकाळी नऊ वाजता या मोहिमेची सुरवात करण्यात आली. यावेळी नागरिकांना स्वाक्षरी करण्यासाठी एक मोठा कोरा फलक लावण्यात आला होता. सकाळच्या वेळी स्वाक्षरी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र काही वेळाने ही गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले होते. काही वेळेनंतर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्थानक परिसरातील नागरिकांना स्वाक्षरी करण्यासाठी आवाहन केले जात होते.
हेही वाचा >>> ठाणे स्थानक परिसराला राजकीय आखाड्याचे रूप ; भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
जनता निवडणुकीत धडा शिकवेल – खा. राजन विचारे
राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. तरुणांना रोजगाराची गरज आहे. असे असताना हजारो तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला कसा जातो. ज्यांनी हा प्रक्लप गुजरातला नेला आहे त्या सर्वांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल. तसेच नरेंद्र मोदींनी देखील महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याच्या विचार करून फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्यावा. असे मत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी या स्वाक्षरी मोहिमेच्या उपक्रमात व्यक्त केले. तर राज्याचे मुख्यमंत्री हे मूळ ठाणेकर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासाबरोबरच ठाणे शहराला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्यावे. असे मत शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा >>> ठाणे : भिवंडीत पाच वर्षांची मुलगी वाहून गेली
महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प गेला
महाविकास आघाडीला सत्ता गेल्याचे पचलेले नसल्याने फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाविकास आघाडीचे नेते सरकारवर टीका करत आहे. तसेच ठाण्यातील पूर्वीची शिवसेना संपलेली आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. येत्या काळात शिंदे – फडणवीस सरकार जोमाने काम करेल. असे मत फलकाच्या अनावरणावेळी उपस्थित असलेले भाजपाचे नेते कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केले. तर फॉक्सकॉन प्रकल्प केवळ महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याची टीका यावेळी उपस्थित असलेले भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी केली.