शिवसेनेला आव्हान देण्यासाठी नवी रणनीती
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आगरीबहुल प्रभागातील शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा प्रथमच आगरी अस्मितेचा नारा देण्यास सुरुवात केली असून उच्चवर्णीयांचा पक्ष ही ओळख पुसण्यासाठी पक्षाने भिवंडी, ठाणे, नवी मुंबई पट्टय़ातील आगरी नेत्यांची फौजच या गावांमध्ये प्रचारात उतरवली आहे. डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील प्रचारातही नगरपालिकेपेक्षा आगरी अस्मिता आणि एकजुटीचा नारा देण्यात आला असून यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत येऊन पोहचली आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातील आगरीबहुल गावांमध्ये शिवसेनेची ताकद मोठी मानली जाते. ही गावे वर्षांनुवर्षे शिवसेनेची बलस्थाने ठरली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही या गावांमधून शिवसेनेला चांगले मतदान झाले होते. डोंबिवलीलगत असलेली २७ गावांतील ग्रामपंचायतींमधून शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांना याच गावांमधून भरभरून मतदान झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची एकूणच आगरीबहुल मतदारसंघावर मदार आहे.
भाजपच्या गोटात चिंता
कल्याण-डोंबिवलीतील शहरी भागात वर्षांनुवर्षे आगरी आणि शहरी भागातील नागरिकांमध्ये एकप्रकारचा सुप्त असा संघर्ष राहिला आहे. भाजपने हा संघर्ष ओळखून डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देताना कोकणी-मराठा असे राजकीय समीकरण चालविले होते. असे असले तरी कल्याण आणि २७ गावांमधील प्रभागांमध्ये फारशी पाळेमुळे नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना येथील प्रभागांमधून यशाची पताका कशी फडकावायची अशी चिंता भेडसावू लागली आहे.
तर आगरी एकजुटीला धक्का..
कल्याण पश्चिमेतील उंबार्डे, सापर्डे, कोळीवली परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याशिवाय डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमध्येही शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. यापैकी उंबार्डे, सापर्डे, कोळीवली परिसर भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या मतदारसंघात येतो. या पट्टय़ात आगरी समाज अधिक संख्येने आहे. हा भाग आपल्या ताब्यात यावा यासाठी भाजपने आगरी अस्मितेची हाक दिली आहे. कपिल पाटील, किसन कथोरे, मंदा म्हात्रे या नेत्यांवर भाजपने या गावांची जबाबदारी सोपवली असून २७ गावांमध्ये आगरी एकजुटीची हाक दिली जात आहे. गावांमधून संघर्ष समिती आणि भाजपचा पराभव झाल्यास आगरी एकजुटीला धक्का पोहचेल असा सुप्त प्रचारही भाजपकडून केला जात आहे. वर्षांनुवर्षे शिवसेनेसोबत राहूनही आगरी समाजाला या पक्षाने काय दिले, असा सवाल जाहीरपणे उपस्थित केला जात असून देशाच्या लोकसभेत आगरी समाजाचा एकमेव खासदार भाजपचा आहे, असा प्रचार कपिल पाटील सभांमधून करत आहेत.