|| प्रसेनजीत इंगळे

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

विरार : वसई-विरार शहरात करोनाचे संकट वाढत असताना आता पुन्हा शहरात रक्ताचा साठा कमी होत आहे. यामुळे करोनाबरोबर रक्त तुटवड्याचा सामनाही वसईकरांना करावा लागणार आहे. शहरात असलेल्या रक्तपेढीत रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपेढ्या कोरड्या पडत चालल्या आहेत. केवळ २ ते ३ दिवस पुरेल इतकाच साठा रक्तपेढ्यात उपलब्ध आहे.

मागील दोन महिन्यांपासून शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर अपघात आणि आजारसुद्धा बळकावत आहेत. यामुळे शहरात रक्ताची मागणी पुन्हा वाढली आहे. परंतु पालिका अथवा सामाजिक संस्था किंवा राजकीय पुढाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात भरवली जाणारी रक्तदान शिबिरे निवडणुकीसंदर्भात अनिश्चितता निर्माण झाल्याने बंद झाले आहेत. करोनाच्या भीतीने रक्तदाते पुढाकार घेत नसल्याने वसई-विरारमध्ये पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जर येणाऱ्या काळात रक्तदात्यांत वाढ नाही झाली तर गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा करणे अशक्य होणार असल्याची चिंता आता रक्तपेढ्या व्यक्त करत आहेत.

वसई-विरारमध्ये केवळ तीनच रक्तपेढया आहेत. मागील वर्षी करोना काळात रुग्णालये पूर्णत: सुरू झाली नसल्याने रक्ताच्या मागणीत घट झाली होती. पण टाळेबंदीनंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सर्वच रुग्णालयाने नियमित सुरू झाल्याने सध्या शहरात महिन्याला ९०० ते १००० रक्त पिशव्यांची गरज आहे. पण सध्या केवळ महिन्याला १२५ ते १५० युनिटच रक्त जमा होत आहे. त्यातही होल ब्लड सेल, प्लेटलेट्स, आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स असे विभाग केले जात असल्याने त्याची संख्या अधिक कमी होत जाते.

नालासोपारा येथील एका रक्तपेढीने माहिती दिली की, थेलेसिमिया, डायलेसीस या रुग्णांना सर्वाधिक रक्ताची गरज असते. त्याचबरोबर गरोदर महिला, रक्ताचा कर्करोग या रुग्णांना आगावू रक्तासाठी नोंदणी करावी लागते. सध्या अनेक रुग्णालयात रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेकांना मुंबई अथवा इतर भागातून दुप्पट पैसे देऊन रक्त आणावे लागत आहे.  नालासोपाऱ्यातील सरला रक्तपेढीचे संचालक विजय महाजन यांनी माहिती दिली की, सामाजिक संस्था, महापालिका, राजकीय पुढारी, रुग्णालये यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे भरविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक रक्तपेढ्यांना नागरिकांनी प्राधान्य देऊन शिबिरे भरविले पाहिजे तरच स्थानिक पातळीवर रक्ताचा साठा निर्माण होईल.  वसई-विरारमध्ये २० हून अधिक थेलेसिमियाचे रुग्ण आहेत, तर डायलेसिस रुग्णांची संख्या ७०९ आहे. यात ३४४ पुरुष तर ३६५ महिलांचा समावेश आहे.

महापालिकेची रक्तपेढी केवळ कागदावरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई-विरार महापालिकेने स्वत:ची रक्तपेढी काढण्याचे योजले होते. पण हा प्रकल्प अजूनही केवळ कागदावरच राहिल्याने वसईकरांना गरजेच्या वेळी रक्तपुरवठा होत नाही. या संदर्भात कोणतही माहिती उपलब्ध नसल्याचे उपायुक्त विजय द्वासे यांनी सांगितले. सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील रक्तपेढी मागील वर्षभरापासून बंद आहे. या संदर्भात पालिकेने माहिती दिली की, एसबीटीसीकडून रक्तपुरवठा बंद झाल्याने ही पेढी बंद आहे.