ठाणे: वाचक संख्येत वाढ व्हावी तसेच तरुण पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून ठाणे शहरात पुस्तकांचा मेळावे भरत आहेत. वाचकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांकडून पुस्तकांवर सवलतींचा पाऊस पाडण्यात येत असून या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यंदा ठाण्यात खुल्या मैदानासह मॅालमध्येही पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आल्याचे दिसून आले.
यंदा ठाणे शहरात पहिल्यांदाच कोरम मॅालमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बुकचोर या समुहामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात सुमारे १० लाख पुस्तके ठेवण्यात आली होती. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध लेखकांची पुस्तके होती. त्यात सर्वाधिक पुस्तके इंग्रजी भाषेतील होती. डैन ब्राउन, जे. के रोलिंग, चेतन भगत, क्रिस्टोफर पाओलिनी, सी.जे ,सैनसम अशा विविध लेखकांची पुस्तके या प्रदर्शनात दिसून आली. प्रदर्शनात पुस्तक खरेदी करताना, पुस्तकाच्या किंमतीवर सवलत दिली जाते. परंतू, याठिकाणी लॅाक द बॅाक्स नावाची संकल्पना राबविली होती. या संकल्पनेत लहान, मध्यम आणि मोठा अशा तीन आकारानुसार खोके होते. या खोक्यात मावेल इतकी पुस्तके वाचकांना खरेदी करावी लागत होती. लहान खोका १२००, मध्यम खोका २ हजार आणि मोठा खोका ३ हजार याप्रमाणे दर आकारण्यात येत होते. या प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा… मुंबई – नाशिक महामार्ग आदिवासी समाजाने दीड तास रोखला; विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन
ठाण्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही साहित्ययात्रा मार्फत खेवरा सर्कल याठिकाणी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मराठी आणि इंग्रजी भाषेतील हजारो पुस्तक उपलब्ध आहेत. त्यात गो. नी. दांडेकर, महेश एलकुंचवार, प्रकाश नारायण संत, गौरी देशपांडे, अच्युत गोडबोले, मुरलीधर खैरनार, गिरीश कुबेर अशा अनेक लेखकांची पुस्तके असून त्यांच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. कांदबरी, प्रवासवर्णन, ऐतिहासिक, वैचारिक लेखन, व्यवस्थापन या विषयांची पुस्तके खरेदी करण्याकडे वाचकांचा सर्वाधिक कल आहे. त्यासह, बालसाहित्य खरेदी करण्यासाठी शालेय विद्यार्थी देखील आपल्या पालकांसह या पुस्तक प्रदर्शनाला भेट देत आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तक खरेदी करावी यासाठी विविध प्रकाशकांनी पुस्तकांवर वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत, अशी माहिती साहित्ययात्राचे विनायक गोखले यांनी दिली.