रिक्षाचालकाला इच्छित स्थळी जाण्यासाठी विचारावे आणि त्याने नकारार्थी मान डोलवावी, हे शहरातील कुठल्याही कोपऱ्यातील ठरलेला भाग. घाईत ठिकाण गाठायचे आहे, पण रिक्षा नाही, अशा स्थितीत अनेकांना काहीशी पायपीट करावी लागते, तर काही वेळा जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागतो. पण ही फरफट आता थांबणार आहे. डोंबिवलीतील एका संस्थेने ‘ऑटो ऑन कॉल’च्या माध्यमातून रिक्षाचालकांना एकत्र करून नागरिकांना रिक्षा वाहतूक सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे. पुरविण्यात येत आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून डोंबिवलीनंतर कल्याणमध्येही एका फोनवर रिक्षा दारात येण्यास सुरुवात झाली आहे.
विशेष करून जवळचे भाडे स्वीकारण्यास रिक्षाचालक तयार नसतात. रिक्षाचालकांच्या या मनमानीला, प्रसंगी होणाऱ्या अरेरावीला कंटाळलेल्या नागरिकांना आता ‘ऑटो ऑन कॉल’ या सुविधेने दिलासा मिळाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ओंकार फाटक यांनी प्रवाशांचा हा त्रास लक्षात घेऊन आरटीओ आणि रिक्षा संघटनांच्या मदतीने प्रवाशांसाठी ही सुविधा नोव्हेंबर महिन्यात डोंबिवलीत सुरू केली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता व कल्याणकरांच्या मागणीमुळे २ फेब्रुवारीपासून कल्याण शहरातही ही सुविधा सुरूकरण्यात आली आहे.
रिक्षांचा तुटवडा
‘ऑटो ऑन कॉल’च्या सुविधेनुसार १५ मिनिटांत रिक्षा दारात उभी राहते. डोंबिवलीकरांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. वाशी, पनवेल, कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने फाटक यांच्याकडे आता रिक्षा चालकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. मेट्रो मॉल, डी मार्ट येथून ग्राहकांना रिक्षा मिळत नाही. त्यामुळे मॉलच्या व्यवस्थापकांनीच फाटक यांना तिथेही सुविधा सुरूकरण्याची मागणी केली. त्यानुसार आता १५ रिक्षा कल्याणमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. सुविधेसाठी संपर्क- ९३२१६०६ ५५५ वा ९३२१९०९५५५.