ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील लाचखोर निरीक्षक राजेंद्र शिरसाठ  व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे कोटय़वधीची मालमत्ता असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास उघड झाली आहे. यामध्ये रोख रक्कम, बँक ठेवी, प्लॉट आणि दुकानाचा समावेश आहे. शिरसाठ याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मागील आठवडय़ामध्ये १५ लाखांची लाच घेताना अटक केली होती.
शिरसाठ याच्या घरी ८ लाख ९२ हजार ३२० रुपये रोख सापडले. पत्नीच्या नावे ऐरोली नवी मुंबई येथे दोन फ्लॅट असून त्यांची किंमत १ कोटी ४४ लाख ४३ हजार १८०, एक केसकर्तनालय, दोन दुकानाचे गाळे यांची एकूण किंमत १ कोटी ६० लाख ७२ हजार ७०६ रुपयांपर्यंत आहे. परळीतील पिंपळगावातही शिरसाठ याची मालमत्ता असून तेथे ८ लाख ७० हजार रुपये किमतीची एक हेक्टर शेतजमीन, ५३ हजार रुपये किमतीचे दोन प्लॉट, तसचे ऐरोली येथील एचडीएफसी बँक ऐरोली येथे ४३ लाख ३५ हजार रुपयांच्या बंक डिपॉझिटच्या दोन पावत्या पोलिसांना सापडल्या आहेत.
लाचखोर अधिकाऱ्याला अटक
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या अभिलेख विभागाचे प्रमुख दिलीप गायकवाड यांना सोमवारी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तक्रारदाराकडे गायकवाड यांनी लक्ष्मीनगर भागातील एका मालमत्तेचा उतारा देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती. मात्र अंतिमत: तडजोड करून साडेतीन हजार अशी रक्कम ठरली होती. यापैकी ५०० रुपयांचा हप्ता गायकवाड यांनी यापूर्वी स्वीकारला होता व यातील उरलेले तीन हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली.
अभियंत्याला अटक  
कल्याण : महावितरणच्या कल्याण विभागातील एका अभियंत्याला अठरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली.
उपअभियंता प्रशांत वाटपाडे यांच्याकडे एका विद्युत ठेकेदाराचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावाला शीर्षक पत्र देण्यासाठी वाटपाडे यांनी २६ हजार रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली होती. या रकमेतील १८ हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना वाटपाडे यांना पथकाने अटक केली.