डोंबिवली – मी रुग्णालयात उपचार घेत आहे. मला सीटी स्कॅन करायचे आहे. मला तातडीने पैशाची गरज आहे. मी तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवितो. ते पैसे तुम्ही मला ऑनलाईन माध्यमातून क्युआर कोड स्कॅन करून परत पाठवा, असे डोंबिवलीतील एका व्यावसायिकाला एका इसमाने फोन करून सांगितले. व्यावसायिकाने तातडीने संबंधिताला ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठविले. त्यानंतर संपर्क करणाऱ्या इसमाने आपली फसवणूक केली असल्याचे समजल्यावर व्यावसायिकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात विजय गजरा हे व्यावसायिक राहतात. ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेते म्हणून करतात. गेल्या महिन्यात तक्रारदार विजय गजरा यांना एका इसमाने संपर्क केला. मी दीपुभाई मोरेनावाला बोलत आहे. मला सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मला तातडीने सीटी स्कॅन करायचे आहे. मला तातडीने पैशांची गरज आहे. मी तुम्हाला ३८ हजार रूपये ऑनलाईन माध्यमातून पाठवितो. त्यानंतर मी तुम्हाला माझा आर्थिक व्यवहाराचा क्युआर कोड पाठवितो. त्यावर तु्म्ही मला मी पाठविलेले पैसे पाठवा, असे सांगितले.
दीपुभाई मोरेनावाला यांनी डोंबिवलीतील व्यावसायिकाला ३८ हजार रूपये ऑनलाईन माध्यमातून पाठविल्याचे लघुसंदेश पाठविले. आपल्या बँक खात्यात दीपुभाई यांचे पैसे जमा झाले म्हणून व्यावसायिकाने दीपुभाई यांनी पाठविलेल्या क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांना अठरा हजार रूपये पाठविले. दीपुभाई यांना पैशाची तातडीने गरज असल्याने आणि त्यांनी स्वताहून संपर्क केल्याने विजय गजरा यांना आपली फसवणूक होत आहे असा संशय आला नाही. १० हजार रूपये दीपुभाई यांना पाठविल्यानंतरही दीपुभाई मोरेनेवाला व्यावयासिकाला सतत संपर्क करून उर्वरित पैसे पाठविण्याची मागणी करत होते.
त्यान्ंतर विजय गजरा यांना संशय आला म्हणून त्यांनी आपल्या बँक खात्यात दीपुभाई मोरेनावाला यांनी पैसे पाठविलेत आहेत का याची खात्री केली तेव्हा त्यांना ते पैसे आपल्या बँक खात्यात जमा झाले नाहीत, असे लक्षात आले. दीपुभाई यांनी आपणास पैसे जमा झाल्याचे बनावट लघुसंदेश पाठवून आपली फसवणूक केली. आणि आपल्याकडून अठरा रूपये खोटे सांगून उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याने व्यावसायिक विजय गजरा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
