उल्हासनगरः आपातकालिन परिस्थितीत जीवनवाहिनी ठरणाऱ्या रूग्णवाहिकेलाच पळवण्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. त्यातही ही रूग्णवाहिका पळवणारे साधेसुधे चोर नसून ते अल्पवयीन आहेत. उल्हासनगर शहरात हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांच्या तपासात त्यांनी आणखी काही वाहने चोरल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरच्या साई सारथी अपार्टमेंटमध्ये राहणारा अभिषेक तिवारी याने आपली एमएच ०५ आर ०८१८ या क्रमांकाची रूग्णवाहिका शिवनेरी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केली होती. रात्रीच्या वेळी तो घरी जेवणासाठी गेल्या होता. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका रूग्णाला रामरक्षा हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज पडली. त्यावेळी अभिषेक यांना सांगण्यात आले. त्यांनी विनंतीनुसार आपली रूग्णवाहिका गाठली. मात्र ज्या ठिकाणी रूग्णवाहिका उभी करण्यात आली होती त्या ठिकाणी रूग्णवाहिकाच नव्हती. रूग्णवाहिका गायब झाल्याने अभिषेक चक्रावले. त्यांनी आसपास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र रूग्णवाहिकेचा काही मागमूस लागला नाही. त्यांनी त्यावेळी येथे सुरक्षा रक्षकाला विचारले. त्यावेळी कुणीतरी रूग्णवाहिका घेऊन जात असताना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर रूग्णवाहिका चोरी झाल्याचे अभिषेक यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अभिषेक यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपास, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. काही तासांतच अंबरनाथ पूर्वेतील हेरंब मंदिर परिसरातून ती रूग्णवाहिका शोधून काढण्यात आली. या घटनेचा सखोल तपास करताना ही कारवाई केवळ रूग्णवाहिका नव्हे तर एक बर्गमन स्कूटर आणि एक बुलेट मोटारसायकल यांच्या चोरीशी संबंधित असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी तिन्ही वाहने जप्त केली असून, संबंधित चार अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात आहेत. हे टोळीच्या स्वरूपात वाहनचोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलांनी चोरी का केली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या प्रकारामुळे उल्हासनगर, अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.