scorecardresearch

Premium

आयटीआयच्या वाटेत संरक्षक भिंतीचा खोडा

कल्याण शहरामध्ये १९९५ साली लाल चौकी येथील एका भाडय़ाच्या जागेत आयटीआय केंद्र सुरू झाले.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

शलाका सरफरे

वापर नसल्याने कल्याणमधील केंद्राची दुरवस्था

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी देण्याचे दावे सरकारकडून सातत्याने केले जात असले तरी कल्याण येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आयटीआय केंद्र केवळ एका संरक्षक भिंतीअभावी धूळ खात पडले आहे. सध्या उल्हासनगर येथे असलेले हे केंद्र कल्याण येथील नव्या सुसज्ज अशा इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. इमारतीमागे असलेल्या नागरी वस्तीला खेटूनही एक भिंत उभारण्याचा प्रस्ताव आहे. ती उभारण्यास नागरिकांचा विरोध आहे. वापराविना असलेल्या या इमारतीची दुरवस्था झाली आहे.

कल्याण शहरामध्ये १९९५ साली लाल चौकी येथील एका भाडय़ाच्या जागेत आयटीआय केंद्र सुरू झाले. पुढे भाडय़ाचा खर्च परवडत नसल्यामुळे हे केंद्र उल्हासनगरला हलवण्यात आले. कल्याण आयटीआयसाठी प्रशस्त जागा देऊन त्यावर कार्यशाळेसह प्रशिक्षकांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या सुसज्ज आयटीआय केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

कल्याणमधील उंबर्डे गावाजवळ तब्बल आठ हजार चौरस मीटर जागेवर आयटीआय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. २० खोल्यांची एक मजली इमारत उभारण्यात आली. १२०० ते १५०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या संस्थेत १५ विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महावितरणकडून या ठिकाणी स्वतंत्र विद्युतव्यवस्थाही करण्यात आली आहे. २००७-०८ साली त्या वेळच्या दर सूचीनुसार या केंद्रासाठी सुमारे ३ कोटी ७० लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. अनेक अडथळे आणि विघ्न आल्यानंतर अखेर २०१३ साली या केंद्राच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पाच वर्षांत केंद्राच्या खर्चात सुमारे २ कोटी २१ लाखांची वाढ झाली. या वाढीव खर्चालाही मंजुरी मिळाली, कामही सुरू झाले. मात्र अद्याप हे केंद्र संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थ्यांसाठी खुले होऊ  शकलेले नाही. आयटीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

भिंतीचा तिढा

या केंद्राच्या तिन्ही बाजूंना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे, मात्र मागील बाजूस भिंत उभारल्यास लोकवस्तीतील स्थानिकांची वाट अडणार असल्याने तिथे भिंत बांधण्यास स्थानिकांचा विरोध असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

इमारतीची दुर्दशा

बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीचा वापर होत नसला, तरी तिची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. नव्या कोऱ्या केंद्राचे रूपांतर निर्जन स्थळात झाले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे कौशल्य विकासाच्या नावाने खर्च केलेला निधी अक्षरश: वाया जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Centers dilemma in welfare due to lack of use

First published on: 24-10-2018 at 02:07 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×