झोपडीधारकांसाठी ३६० कोटी खर्च करूनही खरे लाभार्थी बेघरच
कल्याण-डोंबिवली शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने महापालिका हद्दीत सुमारे ३६० कोटी खर्च करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे बांधून दिली आहेत. या घरांमध्ये झोपडपट्टीतील ‘खरे लाभार्थी बेघर आणि घुसखोर मात्र आत’ असे चित्र असल्यामुळे शासनाचा झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा उद्देश कल्याण, डोंबिवलीत सफल झाला नाही. याउलट घरांची वाढती गरज विचारात घेऊन मुंबईतून येत असलेल्या कुटुंबीयांनी कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील सरकारी जमिनीवर बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे.
नेतिवली टेकडी हे कल्याण शहराचे प्रवेशद्वार आहे. या शहरात लोकल, शिळफाटा रस्त्याने प्रवेश करताना टेकडीवरील झोपडय़ांचे विदारक दृश्य दिसते. बहुतांशी झोपडय़ांमध्ये मुंबईतील तुर्भे, देवनार, अंधेरी, माहीम, धारावी परिसरातून येणारी कुटुंब राहत आहेत. मूळ निवासी झोपडीवाले आणि त्यात नवीन झोपडीधारक मोठय़ा संख्येने नेतिवली टेकडीवरील सरकारी जमिनीवर वास्तव्य करण्यास येत आहेत. या झोपडीधारकांना तत्काळ वीज, पाणी अशी व्यवस्था महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या रहिवाशांच्या सोयीसाठी तत्काळ सार्वजनिक शौचालय उभी करून दिली जातात. टेकडीच्या पायथ्यापर्यंत असलेल्या झोपडय़ा आता टेकडीच्या माथ्यापर्यंत पोहचत चालल्या आहेत. आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त हा सगळा प्रकार दररोज पाहतात. एकाही अधिकाऱ्याची या बेकायदा झोपडय़ांवर कारवाई करण्याची हिम्मत होत नसल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
नेतिवली टेकडीच्या माथ्यावर स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य होते. फडके यांचे आजोळ कल्याणमध्ये होते. त्यामुळे टेकडीवर फडके यांच्या नावाने वास्तू विकसित करण्याचा गेल्या २० वर्षांपासून पालिकेचा प्रयत्न आहे. माजी नगरसेविका दिवंगत सुधा साठे, मुकुंद देसाई, अॅड. नंदकिशोर जोशी हे नेतिवली टेकडीवर फडके यांचे स्मारक करावे यासाठी प्रयत्नशील होते. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे हे स्मारक रखडले. कल्याणमध्ये वासुदेव फडके यांचे स्मारक होण्याचा विषय १९९७ पासून रखडला आहे. त्यावर कोणीही ब्र काढलेला नाही. टेकडीच्या एका बाजूला गुहा आहे.
या भागात उद्यान विकसित करून पर्यटनचे ठिकाण म्हणून विकसित करावे, असे प्रस्ताव दिवंगत नगरसेवक नंदकिशोर जोशी यांनी पालिकेला दिले होते. त्याची कार्यवाही झाली नाही. आता नेतिवली टेकडी पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत झोपडय़ांनी गिळंकृत होत असताना महापालिकेने बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. झोपडीधारकांसाठी योजना राबवूनही शहरातील झोपडय़ा वाढत असल्याने शहरातील मूळ रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुबलक पाणीपुरवठा
या झोपडय़ांना पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरून चोरून पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक झोपडीधारक पाण्याचे देयक अदा करीत नाहीत. तरीही या झोपडय़ांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. या झोपडय़ा म्हणजे एकगठ्ठा मतदान होण्याचे आगार असल्याने काही राजकीय नेते या झोपडय़ांना पोसण्यासाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहेत.
गुन्हेगारांचे अड्डे :- या झोपडय़ांमधून नेहमीच गुन्हेगार पोलिसांकडून पकडले जातात. गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या या झोपडय़ा पालिका प्रशासन पोसून नक्की कोणाचा विकास साधत आहे, असा प्रश्न जागरूक रहिवासी प्रकाश सिनकर यांनी केला आहे. ‘बीएसयूपी’ योजनेतून चार ते पाच हजार घरे बांधली. ती कोणाच्या घशात गेली, असा आरोप रहिवासी करीत आहेत.