आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी आझाद मैदानात मोर्चा काढला होता. मात्र, त्यास भेट देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळावरून भाषण न करताच निघून गेले.
ठाण्यातील उपवन भागात आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने मुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी येथे आले होते. कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण सुरू होताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, मुंबईतील आदिवासी बांधवांना मुलभूत हक्क मिळत नसल्यामुळे तसेच काही प्राधिकरणांमार्फत त्यांना बेघर करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे ‘आम्हाला गोळ्या घालून मरण द्या नाहीतर सन्मानाने जगवा’, अशा स्वरुपाची मागणी करत आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी आझाद मैदानात मोर्चा काढला होता.