ठाणे : घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचे पत्र मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले.बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे विणले. या शाखा लोकांना न्यायमंदिर वाटेल असे आपण काम करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात. परंतु आता पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही. सर्व जण कार्यकर्ते आहेत. कोणी मोठा आणि छोटा नाही. शिवसेना पुढे न्यायची आहे. ८० टक्के समाज कारण आणि २० टक्के राजकारण याप्रमाणे काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही; खासदार मिलिंद देवरा यांचा आरोप

मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत ठेवला आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता राहणार आहे, असे सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचविण्यासाठी धाडस करून पाऊल उचलले. चूकीचे पाऊल उचलले असते तर इतके लोक सोबत आले नसते, असेही ते म्हणाले.बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखविण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. खिचडी आणि करोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आताआणखी काही लोक जाणार आहे. त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते म्हणून हेलिकॉप्टर प्रवास टीका होत नव्हती, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. तसेच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केला.

हेही वाचा >>>एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिलाय; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाणे कोंडले

या मेळाव्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आले होते. गर्दी इतकी झाली होती की कार्यक्रमस्थळी बसण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावे लागले. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी करण्याची व्यवस्था मैदान परिसरात करण्यात आली होती. परंतु तिथे वाहने उभी करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेकांनी परिसरातील रस्त्यावर वाहने उभी केली. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कॅडबरी चौकातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकीवर होऊन शहर कोंडले होते. यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणारे अनेकजण या कोंडीत अडकून पडले होते.