अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिंदेच्या शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. गेल्या आठवड्यात वाघ यांच्या शहरातील भेटीनंतर वाळेकर यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी तुफान प्रतिउत्तर दिले आहे.

लाडक्या बहिणींचा अपमान जसा देवा भाऊंना सहन होणार नाही तसा एकनाथ शिंदे यांनाही सहन होणार नाही. ते तुम्हाला सोलून काढतील, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. अंबरनाथ दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी मंचावरून वाळेकर यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. त्याची चित्रफित सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद वाढला आहे. स्थानिक नेत्यांचा वाद आता पक्षाच्या मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. भाजपचे नेत्या चित्रा वाघ गेल्या आठवड्यात बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यानंतर शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.

योगायोगाने चित्रा वाघ पुन्हा शहरात प्रचारानिमित्त आल्या. त्यावेळी अरविंद वाळेकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी चित्रा वाघ यांनी खालच्या स्तरावर टीका केली. अरविंद वाळेकर यांना आण्णा या नावानेही ओळखले जाते. त्यांनी त्याच नावाचा आधार घेत वाघ यांनी टीका केली.

मी कुणाचे हिशोब बाकी ठेवत नाही, असे बोलत असतानाच वाळेकर यांच्या टीकेचा उल्लेख करत वाघ म्हणाल्या की हम किसी को छेडते नही, किसी ने छेडा तो छोडते नाही. माझं नाव चित्रा वाघ… मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. इथे कोण आण्णा की टण्णा, मी कोणाला ओळखत नाही. फोटो पाहिला म्हटल कोण भाऊ आहे आपला जो माझ्यावर बोलतो?” त्या पुढे म्हणाल्या की, “मला माझ्या भावाची काळजी वाटली… खा-पी तंदुरुस्त हो, अजून निवडणूक बाकी आहे, असाही टोला यावेळी वाघ यांनी लगावला.

शिंदे यांचा उल्लेख करून इशारा

चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत अरविंद वाळेकर यांना इशारा दिला आहे. “आम्ही देवा भाऊंसोबत शिंदे साहेबांच्याही लाडक्या बहिणी आहोत. ते कोणत्याही बहिणीचा अपमान सहन करत नाहीत. त्यांना कळलं तर सोलून काढतील.” या विधानाने वाघ यांनी वाळेकर यांना थेट इशाराच दिला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

“माझ्या नादाला लागू नका”

वाघ यांनी पुन्हा एकदा त्यांना आव्हान देणाऱ्यांना इशारा देत म्हटले की “माझ्या नादाला लागू नका… भलेभले मागे लागून थकले. तू कुठे मधे उडी मारतोस?” त्यापुढे असेही म्हणायला की मी माझ्या पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी अंबरनाथ शहरात आले होते. मी कुणावरही बोलले नव्हते. मात्र त्यांनी आपल्यावर टीका केल्याने मला बोलावे लागले. मी कोणाचाही अनादर करत नाही, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

“निवडणूक आहे—हिशोब द्या!”

पालिकेच्या निवडणुका आहेत तर तुम्ही शहरात काय केले हे सांगा. आमच्यावर कसल्या टीका करता, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. निवडणुकीतले हिशोब त्याच वेळी चुकते करणे गरजेचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील या शब्दयुद्धामुळे स्थानिक राजकारणात वातावरण तापले आहे.

शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जाते आहे. येत्या काळात या प्रचाराला धार येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या महायुतीतील या पक्षाच्या नेत्यांना एकमेकांवर टीका करताना संयम राखावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयमाचा कस लागणार आहे.