टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा
ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या र्निबधांमध्ये मंगळवारपासून अंशत: शिथिलता मिळाल्यानंतर त्याचा परिणाम बाजार आणि वाहतुकीवर झाला. ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांमधील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती, टोलनाक्यांवर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी झाली. मुलुंड, खारेगाव, वाशी या टोलनाक्यांवर वाहनांच्या अक्षरश: राांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी २० ते ३० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. मुलुंड टोलनाका परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. त्यातच टोलनाक्यावर टोलवसुलीही सुरू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. अर्ध्या ते पाऊण तासानंतर येथील वाहतूक कोंडी सुटल्याचे वाहनचालकांनी सांगितले.