वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत होणारा पाण्याचा पुरवठा यात वाढत जाणारी तफावत यामुळे बदलापूर शहरातील विस्तारीत भागात आता पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंगळवारी विस्तारीत बदलापुरातील गोल्डन व्हॅली या गृहसंकुलातील नागरिकांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हंडी-कळशी मोर्चा काढला. २४ तास नको किमान २४ मिनीटे पाणी द्या अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. लवकरच पाण्याची वेळ वाढवून दिली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा >>>डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र त्या तुलनेत पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. शहरातील उंच, सखल भागात पाण्याची समस्या बारमाही आहे. अनेकदा वीजेचा पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा फटका पाणी वितरण व्यवस्थेला बसतो. त्यात शहराच्या चारही बाजूंना गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांना पाणी पुरवठा करण्यात जीवन प्राधिकरणाच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. बदलापूर पश्चिमेतील सोनीवली या शहराच्या एका टोकाला असलेल्या गोल्डन व्हॅली या गृहसंकुलातील नागरिकांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्च्यात महिलांची संख्या मोठी होती. महिला हंडा – कळशी घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा >>>ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी

आम्हाला बांधकाम व्यावसायिकाने २४ तास पाणी पुरवठ्याची हमी दिली होती. मात्र आजच्या घडीला आम्हाला साधे २४ मिनीटही पाणी मिळत नाही. अनेकदा तर दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. अशावेळी टंँकरसाठी तरी किती पैसे खर्च करणार असा सवाल यावेळी उपस्थित महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर बोलताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता माधुरी पाटील यांनी लवकरच पाणी सोडण्याच्या वेळेत वाढ केली जाईल, असे आश्वासन गोल्डन व्हॅली इमारतीतील रहिवाशांना दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.