कल्याण – कल्याण पूर्व भागात मागील काही महिन्यांपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, व्यापारी, शाळा चालक, व्यावसायिक त्रस्त आहेत. सतत वीज पुरवठा खंडित होऊनही महावितरणकडून याविषयी कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण पूर्वेतील कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा महावितरणला दिला आहे.
ठाकरे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील, विभागप्रमुख किरण निचळ यांच्या पुढाकाराने महावितरणचे कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश बोडखे, साहाय्यक अभियंता राठोड यांना एक निवेदन देण्यात आले. कल्याण पूर्व भागात नागरी वस्ती वाढत आहे. टोलेजंग इमारतींचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वस्तीचा विचार करून महावितरणने कल्याण पूर्व भागात विजेचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जुन्याच रोहीत्र आणि वीज वाहिन्यांवरून नवीन वस्ती आणि परिसराला वीज पुरवठा केला जातो. वाढत्या वीज वापराच्या प्रमाणात पुरवठा होणारा वीज प्रवाह कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी सतत वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. दिवस, रात्र हा सतत विजेचा लपंडाव सुरू आहे, असे विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील यांनी सांगितले.
कल्याण पूर्व भागात अनेक शाळांमध्ये संगणकाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. डिजिटल फळे शाळांमध्ये आहेत. वीज प्रवाह खंडित झाला की शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संगणकीकृत यंत्रणा बंद पडते. दूध, दही, गोडपदार्थ विक्रेते दुकानातील शीतकपाट बंद राहत असल्याने पदार्थ नाशिवंत होत असल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. झेराॅक्स दुकाने बंद राहत आहेत. लहान घरगुती व्यवसाय काही महिला बचत गट घरगुती पध्दतीने करतात. यामधील बहुतांशी व्यवहार हे विजेवर अवलंबून आहेत. वीज प्रवाह खंडित झाला की या व्यवसायांना फटका बसतो. बहुतांशी नोकरदार अलीकडे घरातून कार्यालयीन काम करतात. विदेशातील कंपन्यांमध्ये काम करणारे पण घरातून कंपनीच्या संपर्कात असलेल्या तरूणांना खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसतो, असे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
महावितरणला कल्याण पूर्व भागातील सर्वाधिक वीज देयकाच्या माध्यमातून महसूल मिळतो. त्यामुळे नागरिकांना चोविस अखंड वीज पुरवठा मिळाला पाहिजे, अश मागणी शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांकडे केली.पडघा येथील एका मुख्य वीज पुरवठा केंद्रातील एक फिडर अचानक बंद होतो. त्यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी येतात. हा वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत स्थानिक पातळीवर वीज पुरवठा खंंडित होतो. कल्याण पूर्वेचा वीज पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.