ठाणे : कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा अमली पदार्थाच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.ठाणे शहरात आयोजित केलेल्या ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपस्थिती लावली. या कार्यक्रमापुर्वी त्यांनी राज्यातील गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रेमंड गेस्ट हाऊसमधील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.

पुणे येथील तरुणावरील लैंगिक अत्याचार प्रकरण, महिला सुरक्षा, बीड येथील सरपंचाची हत्या, राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचे प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हि विशेष बैठक पार पडली आणि त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक मजबूत महासायबर प्लॅटफार्म तयार करण्यात आला असून त्याचे बैठकीत सादरीकरण झाले. महिलांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार अशा गुन्ह्यांचे अतिशय कमी वेळेत आरोपपत्र कसे जाईल, यावर चर्चा झाली. अमली पदार्थ विरोधात कारवाई कशी सुरू आहे आणि पुढे कशाप्रकारे कारवाई केली पाहिजे, यावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीने काय करता येईल, यावरही चर्चा झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमली पदार्थाबाबत शुन्य सहनशीलता धोरण राबविले जात आहे. त्यामुळे अमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारने जो नवीन कायदा तयार केला आहे. त्यात शक्ती कायद्यातील अनेक गोष्टी अंतर्भुत केल्या आहेत. त्यांचा पुन्हा आढावा घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस सुरवातीपासून कठोर तपास करीत आहेत. संपूर्ण पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उज्वल निकम यांना नेमले आहे. त्यामुळे आरोपींना कठोरता कठोर शिक्षा मिळावी असा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले