वाहतूक बदलामुळे महापालिका परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी;  नागरिकांकडून नाराजीचा सूर

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता अडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या जाहीर सभेसाठी भले मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असून यामुळे शुक्रवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत टीएमटी बस गाडय़ांसह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ा अडकून पडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.

सेंट्रल मैदानात न्यायालयाच्या आदेशामुळे तर गावदेवी मैदानात शांतता क्षेत्रामुळे जाहीर सभा घेण्यास बंदी असल्याने यंदाही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा रस्ते अडवूनच होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता अडवून मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे व्यासपीठ गुरुवारी सायंकाळपासून उभारण्याचे काम सुरू होते. यावेळेस आयोजकांकडून खुच्र्या या पदपथांवर आणून ठेवण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांचे हाल झाले. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून मुख्यालयासमोरील एक रस्ता व्यासपीठ उभारण्यात आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक संत ज्ञानेश्वर मार्गावरून वळवण्यात आली होती. पूर्वीच अरुंद असणाऱ्या आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केलेल्या संत ज्ञानेश्वर मार्गावरून वाहनांचा भार वाढल्याने या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. टीएमटी बस गाडय़ा, रिक्षा आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भार या चिंचोळ्या मार्गावर वाढून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परिणामी महापालिकेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गावर मोठी कोंडी झाली होती.  या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतुकीत अधिक भर पडून वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे पुन्हा मुख्यालयासमोरील दोन्ही मार्ग बंद करण्यात आल्यामुळे महापालिका परिसरासह, नितीन जंक्शन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच अल्मेडा सिग्नलहून महापालिकेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक बंद केल्याचे दिसून आल्यानंतर मार्ग बदलताना वाहनचालक मोठे संभ्रमात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेने ठाणेकरांची वाट अडल्याने अनेक प्रवाशांकडून सभा आयोजकांविषयी संताप व्यक्त होत होता.