कल्याण – मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेतर्फे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता कल्याण तालुक्यातील कल्याण बदलापूर रस्त्यावरील खोणी गावात आयोजित केला होता. गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री आणि इतर नेते, वरिष्ठ अधिकारी येणार म्हणून मागील दोन दिवसात खोणी गाव स्वच्छ, सुंदर आणि चकाचक करण्यात आले होते. भोजनाचा रांधा सकाळीपासून सुरू होता. पण दुपार टळली तरी मंत्री कार्यक्रम स्ठळी न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

गावात कुठेही धूळ, कागदचा कपडा, कचरा सापडणार नाही अशा पध्दतीने दोन दिवसात खोणी गावात स्वच्छता करण्यात आली. गावातील रस्ते काँक्रिटचे आहेत. घरांना खेटून असलेल्या रस्त्याच्या कडाही सिमेंट काँक्रीटने लिपून घेण्यात आल्या आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून खोणी गाव ओळखले जाते. या गावची ग्रामपंचायत आणि सरपंच पदाची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. पलावा वसाहतीला खेटून असलेले हे टुमदार गाव आदर्शवत गाव म्हणून ओळखले जाते.

गावातील प्रशस्त रस्ते, सार्वजनिक ठिकाणी असलेले प्रशस्त मंदिर आणि त्याचा मोकळा सभामंडप त्यामुळे जिल्हा परिषदेने या गावाची मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरिय शुभारंभ करण्यासाठी निवड केली. सकाळपासून गावात मंत्री, नेत्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. काल रात्रीपासूनच काही जिल्हा परिषद कर्मचारी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी गावात तळ ठोकून होते.

बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ होता. सकाळीचा भोजनाची जय्यत तयारी सुरू होती. वरणाला दिलेल्या फोडणीचा सुग्रास स्वाद परिसरात पसरला होता. काही राजकीय मंडळी सकाळीच पावणे नऊच्या वेळेत सभास्थानी घाईत पोहचली. तोपर्यंत उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण दुपारी १२ वाजता येणार आहेत असा संदेश आला. शिवसैनिकांना दुपारी १२ वाजता कार्यक्रमस्थळी हजर होण्याचे आदेश लघुसंदेशाद्वारे देण्यात आले. त्यानंतर मंत्री दुपारी दोन वाजता येणार असे जाहीर करण्यात आले. अशाप्रकारे कार्यक्रमाच्या वेळा टळून जात होत्या.

दुपारी तीन वाजताच्या दरम्यान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे कार्यक्रम स्थळी हजर झाले. आता शिवसैनिकांनी तातडीने कार्यक्रमस्थळी यावे, असे संदेश पाठविण्यात आले. पण सकाळीच कार्यक्रम स्थळावरून पाठ फिरून आलेला कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातील शिवसैनिक पुन्हा दुपारी कार्यक्रम स्थळी फिरकला नाही.सभा मंडपात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून स्थानिक नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. सकाळपासून आलेली ही स्थानिक मंडळी दुपारनंतर मात्र कंटाळून निघून गेली.

मंत्रीगण येण्यास सुरूवात झाल्यावर सभा मंडपात पुन्हा गर्दी जमविण्यात आली. शिळफाटा ते काटई बदलापूर रस्त्यावर आदळआपट करतच वाहने धावतात. पण मंत्री येणार म्हणून काटई निळजे उड्डाण पूल, काटई बदलापूर रस्त्यावरील खड्डे रात्रीच भरून जणू हे रस्त सिंगापुरी आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेने केला आहे. मनसेचे नेते राजू पाटील यांनी या सर्व कृत्रिम चकाचकपणावर समाज माध्यमांतून टीका केली आहे.