ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी केलेल्या दौऱ्यामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांना सर्वत्र अस्वच्छता दिसून येण्याबरोबरच ७० हुन अधिक सफाई कामगार गैरहजर असल्याचे दिसून आले. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी सफाईचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. रुग्णांना देण्यात येणारे जेवण गरम राहिल व स्वयंपाकघरात स्वच्छता राहिल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांशी सौजन्याने वागा, रुग्णालयातील भंगार तातडीने हटवा आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 3 ऐवजी 6 दिवस सेवा सुरू ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाण्यात पुन्हा काही काळ वाहतूक कोंडी, यावेळी मुंबई पालिकेच्या वाहनाला अपघात झाल्याचे निमित्त…

या पाहणी दौऱ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय डॉ. अनिरुद्ध माळगांवकर हे उपस्थित होते. रुग्णालयाच्या सफाईसाठी १८० कर्मचारी अपेक्षित असताना हजेरीपटावर १०८ कर्मचारीच आढळून आल्याने आयुक्त बांगर यांनी संबधित विभागाची कान उघडणी केली. रुग्णालयाचा सर्व परिसर हा स्वच्छ राहिलाच पाहिजे, याबाबतत कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या तळमजल्यावरील सर्व प्रकारच्या तपासणीचे बाह्यरुग्ण विभाग, क्ष- किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय कक्षाची पाहणी, लेबर वॉर्ड, एनआयसीयू, औषधी कक्ष, अतिदक्षता विभागांची पाहणी त्यांनी केली. सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत केसपेपरसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याने रुग्णांना विलंब होणार नाही व वेळेत उपचार होतील यासाठी केसपेपर व औषधांसाठी अतिरिक्त खिडक्या वाढविणे तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र असलेल्या खिडकीवर गरोदर मातांचाही समावेश करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तपासणीनंतर रुग्णांना देण्यात येणारे औषध घेण्यासाठी रुग्णांची फार मोठी रांग असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. औषधे घेण्यासाठी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी अतिरिक्त औषध खिडक्या वाढविण्यात याव्यात व यासाठी लागणारा अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी वर्ग घेण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. या पाहणीदौऱ्यादरम्यान दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागाला दिले आहे.

हेही वाचा >>>शिळफाटा मार्गावरील वाहतूक रात्री बंद

रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सद्यस्थितीत २० बेड कार्यरत असून अतिरिक्त १० बेड कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत दारिद्रयरेषेखालील रुग्णांचे मोफत उपचार केले जातात. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चर्चा केली असता सोनोग्राफी मशीनचे कारट्रेज संपल्याचे निदर्शनास येताच तातडीने मशीनसाठी कारट्रेज खरेदी करा व रुग्णालयातील तातडीच्या खरेदीसाठी १ लाख रुपयांची रक्कम वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्तरावर देण्याबाबत सांगितले. कोणत्याही कारणास्तव रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गोरगरीब रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांनी सुरक्षा रक्षक किंवा कर्मचाऱ्यांना माहिती विचारल्यास त्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>>ठाणे: “फक्त एकाच शिक्षिकेच्या खांद्यावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी”, आमदार संजय केळकर यांची प्रशासनाकडे नाराजी

गोवर वॉर्डची पाहणी
गोवर वॉर्डचा आढावा घेताना किती रुग्ण दाखल आहेत, आयसीयूमध्ये रुग्ण दाखल आहेत का, दररोज किती रुग्ण दाखल होतात याची माहिती घेतली. त्याचबरोबर पार्किंगप्लाझा येथे किती रुग्ण दाखल आहेत याचाही आढावा घेतला. गोवरच्या बालकांची बालरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रुग्णालयातील भंगार तातडीने हटवा
रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस व डकमध्ये भंगार झालेले बेडस् आणि इतर साहित्य इतरस्त्र ठेवल्याचे निदर्शनास येताच हे साहित्य तातडीने हटविणे तसेच पॅसेजमधील सामान काढून ते मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच या डकमध्ये पाणी साचणार नाही, पॅसेज स्वच्छ राहतील या दृष्टीने कार्यवाही करावी. पॅसेजमध्ये चेंबरची झाकणे नीट बंद असतील याची दक्षता घ्यावी, तसेच भिंत्तीवरील फाटलेली व अर्धवट अवस्थेत असलेली माहितीपत्रके काढण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या उद्यानामध्ये आणखी झाडे लावण्यात यावीत. जेणेकरुन येथील वातावरण प्रसन्न राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner abhijit bangar order to take action against the contractor due to unsanitary conditions at chhatrapati shivaji maharaj hospital in kalwa amy
First published on: 16-12-2022 at 12:03 IST