कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध विभागांमध्ये काही ठराविक कर्मचारी एकाच विभागात नोकरीला लागल्यापासून १० ते १८ वर्षापासून ठाण मांडून आहेत. अशा कर्मचाऱ्यांची यापूर्वी बदली होऊनही राजकीय, मंत्रालयातून दबाव आणून या कर्मचाऱ्यांनी आपल्या खुर्चीला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. पालिकेतील अशा विविध विभागात ठाण मांडलेल्या सहा वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून सामान्य प्रशासन विभागाने विभाग, प्रभागस्तरांवरून मागवली आहे.

या हालचालींमुळे पालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अटळ आहेत. पालिकेतील काही कर्मचारी एकाच विभागात एकाच पद, खुर्चीवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्या विभागात त्या कर्मचाऱ्यांची हक्कदारी तयार झाली आहे. काही कर्मचारी नोकरीला लिपिक म्हणून एका विभागात लागल्यानंंतर त्याच विभागात ते वरिष्ठ लिपिक, अधीक्षक अशा पदापर्यंत मजल मारत गेले आहेत.

वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत असल्यामुळे बहुतांशी कर्मचाऱ्यांचे ठेकेदार, विकासक, मध्यस्थ यांच्याशी साट्यालोट्याचे स्नेहसंबंध निर्माण झाले आहेत. लेखा अभियांत्रिकी विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पालिकेची कामे आपणास मिळावीत म्हणून यापूर्वी अन्य व्यक्ती, नातेवाईकांच्या नावे खासगी बांधकाम कंपन्या स्थापन केल्या होत्या. या माध्यमातून विकास कामांबरोबर स्वताचा खिसा भरण्याचे काम केले, अशा तक्रारी आहेत.

या ठाणमांड्या कर्मचाऱ्यांमुळे पालिका प्रशासनाचे कसे नुकसान होते. ठेकेदार आणि कर्मचारी यांचे कसे लागेबांधे तयार झाले आहेत. याचे सविस्तर वृत्त काही महिन्यापूर्वी ‘लोकसत्ता’ सहदैनिकाने दिले होते. पालिकेतील साडे सहा हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दीडशे ते दोनशेहून अधिक कर्मचारी, अधिकारी नोकरीला लागल्यापासून एकाच विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. लेखा अभियांत्रिकी, लेखा, आरोग्य, शिक्षण, सामान्य प्रशासन, भंडार, वाहन आणि नगररचना विभागातील सुमारे ३५ ते ४० कर्मचारी १५ ते १८ वर्षापासून पदोन्नत्ती मिळाल्यानंंतरही एकाच विभागात ठाण मांडून आहेत.

या कर्मचाऱ्यांमुळे पालिकेत गैरव्यवहार, मध्यस्थांमार्फ पैसे घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडणे असे प्रकार वाढत चालले आहेत. दरवर्षी कडोंमपातील दोन ते तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडतात. गेल्या २५ वर्षातील अशा लाचखोरांची एकूण संख्या सुमारे ४८ झाली आहे. ठाण मांडणारे बहुतांशी कर्मचारी बदली झाली की राजकीय दबाव आणत असल्याने अधिकाऱ्यांची अडचण होत असल्याची पालिकेत चर्चा आहे.

पालिकेतील अनेक विभागात काही ठराविक कर्मचारी अनेक वर्ष ठाण मांडून आहेत. याची माहिती आयुक्त गोयल यांना मिळाली. आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला एकाच विभागात सहा वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले. पालिकेच्या सॅप सिस्टिमवर ही माहिती उपलब्ध आहे. सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांनी सर्व विभाग प्रमुख, प्रभाग साहाय्यक आयुक्तांना सहा वर्षाहून अधिक काळ आपल्या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या माहिती संकलनाच्या कामामुळे ठाणमांड्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.