कल्याणमधील वाडेघर येथील एका जमिनीचे विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) बिल्डरांना चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील साहाय्यक संचालक नगररचनाकार जितेंद्र भोपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेचे आमदार अ‍ॅड.अनिल परब यांनी कल्याणमधील वाडेघर येथील एका आरक्षित जमिनीवरील टीडीआर घोटाळ्याची माहिती उघड केली होती. या टीडीआर प्रकरणात अनियमितता असल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली होती. विधान परिषद सभापतींनी या प्रकरणाची दखल घेऊन शासनाला चौकशीचे आदेश दिले होते. नगरविकास विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाणे येथील साहाय्यक संचालक नगररचनाकार जितेंद्र भोपळे यांची नियुक्ती केली आहे. भोपळे यांना येत्या पंधरा दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याची चौकशी करताना पूर्ण सत्य बाहेर येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच कोणताही मुलाहिजा न बाळगता आपले अभिप्राय या चौकशी प्रकरणात द्यावेत, अशी मागणी आमदार परब यांनी पुण्याचे नगररचना संचालक क. रा. आकोंडे यांच्याकडे केली आहे. वाडेघर येथील ज्या आरक्षित जमिनीचा टीडीआर पालिका अधिकाऱ्यांनी विकासकांना दिला आहे, ती जमीन कागदोपत्री पालिकेच्या ताब्यात असली तरी त्या जमिनीवर अतिक्रमणे आहेत. या जागेचे  एका तत्कालीन आयुक्ताने विकासकांशी संगनमत करून टीडीआर दिला. त्यानंतरच्या आयुक्ताने या जागेवरील २० टक्के अतिक्रमण हटविल्याशिवाय टीडीआर दिला जाणार नाही, असे प्रशासकीय आदेश काढले होते.