गाडय़ांचे फलाट निश्चित नसल्याने कल्याण स्थानकात गर्दी

कल्याण रेल्वे स्थानकात गाडी नेमकी कोणत्या फलाटावर लागेल, याचा नेम नसल्यामुळे आणि गाडय़ांचे फलाट रोजच बदलण्यात येत असल्यामुळे संभ्रमात पडणाऱ्या प्रवाशांना नाइलाजाने पादचारी पुलांवरच उभे राहून गाडय़ांची वाट पाहावी लागत आहे. रेल्वे स्थानकांतील फेरीवाले हटवण्यात आले असले तरी या समस्येचे काय, असा सवाल सामान्य प्रवासी करीत आहेत.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राजकीय पक्षांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून टीकेचे धनी झालेल्या रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय समिती नेमली. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे काही अधिकारी रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा करीत आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस आणि लोकल गाडय़ांचा फलाट निश्चित नसल्याने त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना आजही सहन करावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाडय़ा कोणत्याही फलाटावर येतात.

त्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर पोहोचण्याच्या धडपडीत नेहमीची गाडी सुटू नये म्हणून प्रवासी पादचारी पुलावरच गाडीची वाट पाहणे पसंत करतात. त्यामुळे पादचारी पुलांवर नेहमीच मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. त्यातही मुंबईच्या दिशेकडील पूल अरुंद असल्याने त्याचा फटका प्रत्येक प्रवाशाला बसतो. ऐन गर्दीच्या वेळेत ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे एखाद्या वेळी फलाट क्रमांक तीनची गाडी फलाट क्रमांक सातवर आल्यास

प्रवाशांची तारांबळ उडते. त्यामुळे धावत जाऊन प्रवाशांना गाडी पकडावी लागते. त्यामुळे अशा ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे. सकाळी बहुतेकदा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असते. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांना घरातून तासभर आधीच निघावे लागते.

कल्याण रेल्वे स्थानकात येणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ा आणि लोकल गाडय़ांचे नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन असमर्थ असल्याने प्रवाशांना पादचारी पुलावर उभे राहवे लागते.

विलंबाने उद्घोषणा

कोणती गाडी कोणत्या फलाटावर येणार हे निश्चित नसल्यामुळे अनेक फलाटांवरील इंडिकेटर बंद असतात. रेल्वेकडून गाडी काही अंतरावर असताना फलाटाचा क्रमांक घोषित करण्यात येतो. त्यामुळे गाडीचा मार्ग बदलल्यास पुन्हा धावत जिने चढून दुसऱ्या फलाटावर जावे लागते. या गडबडीत काही प्रवाशांची गाडी चुकते. काही जण गाडी पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडतात, असे नीलेश मोहंती या प्रवाशाने सांगितले.