ठाणे : टाळेबंदी तसेच निर्बधांच्या कालावधीत विजेचा लपंडाव, वीज तोडणी अशा अनेक तक्रारी बुधवारी सायंकाळी ठाण्यातील नागरिक, व्यापाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांसमोर मांडल्या. या वेळी महावितरणचे अभियंते विविध विभागांत भेटी घेऊन तक्रारींचे निरसन करतील, अशी ग्वाही मुख्य अभियंते अरविंद बुलबुले यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात विविध तांत्रिक कारणांमुळे विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. टाळेबंदी तसेच निर्बधांमुळे अद्यापही खासगी कंपन्यांतील अनेक कर्मचारी घरूनच काम करत आहेत. त्यामुळे या कामगार वर्गाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यातच ग्राहकांनी विद्युत देयक वेळेत भरले नसल्याने विद्युत मीटर काढल्याचे प्रकारही समोर आले आहे. यासंदर्भाच्या अनेक तक्रारी आ. संजय केळकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी आ. संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी महावितरणच्या अभियंत्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ठाण्यातील विविध भागांतून नागरिक त्यांच्या तक्रारी घेऊन आले होते. या बैठकीत केळकर यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या मदत क्रमांकावर संपर्क साधूनही कोणीही कर्मचारी नागरिकांचे फोन उचलत नसल्याचा सूर सर्व तक्रारींमध्ये पाहायला मिळाला.

करोनामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही नुकसान झालेले आहे. केवळ एका महिन्याचे विद्युत देयक भरण्यास विलंब झाल्यास महावितरणचे कर्मचारी विद्युत जोडणी तोडण्यास येत असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला. संजय केळकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांना मदत क्रमांकावर उत्तरे मिळत नसतील तर ही सेवाच बंद करा, असेही केळकर यांनी अभियंत्यांना खडसावले. या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी मदत क्रमांकावरून नागरिकांना उत्तरे मिळत नसल्यास लवकरच सर्व विभागांतील अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक नागरिकांना पुरविला जाईल असे सांगितले.