ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता पदाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. गेली अडीच वर्षे कळव्यातील नगरसेवकाला विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाल्याचा मुद्दा मांडत आता ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला ही संधी मिळावी, यासाठी पक्षातील एक गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारडय़ात आपले मत टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्ष नेते पद मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते पद निवडीवरून ठाणे विरुद्ध कळवा-मुंब्रा असा वाद रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कळवा-मुंब्रा हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. याच भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले. त्यांच्या जागी आता नवीन विरोधी पक्ष नेता निवडला जाणार आहे. पुढील सव्वा दोन वर्षे हे पद ठाण्याला द्यावे, अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी बैठकीत मांडली. त्यावर कळवा-मुंब्य्रातील नगरसेवकांनी आक्षेप घेऊन कळवा-मुंब्रा विभागालाच हे पद देण्याचा आग्रह धरला. तसेच विरोधी पक्ष नेते पद महिलांना मिळावे, अशी मागणी काही केली. या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदाबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

‘डिसेंबरमध्ये निर्णय’

सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विरोधी पक्ष नेते पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या पदाबाबत डिसेंबर महिन्यात निर्णय घेतला जाणार असून त्यावेळेस नगरसेवकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.