कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या मुख्य निवडणुकीसाठी आरक्षण कोणते, याविषयी पुरेशी स्पष्टता नसल्याने येथील राजकीय वर्तुळात सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.
बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली असून नगराध्यक्ष कोण होणार, याविषयी येथील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. यासंबंधीची आरक्षण प्रक्रिया यापूर्वीच पार पडली असली तरी प्रशासनाकडे यासंबंधीचे ठोस आदेश नसल्याचे शुक्रवारी दिवसभर सांगण्यात येत होते. येत्या सोमवापर्यंत यासंबंधीची माहिती संबंधितांना देण्यात येईल, असेही नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे बदलापुरात ‘शिंदेकृपा’ कोणावर होणार हा प्रश्न अजून तरी गुलदस्त्यातच आहे.
बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली आहे. खासदार आणि आमदार ही दोन्ही पदे भाजपकडे असली तरी बदलापूर नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने नगराध्यक्ष मात्र शिवसेनेचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला असला तरी हे पद नेमके कसे आरक्षित आहे, याविषयी प्रशासकीय वर्तुळात स्पष्टता नसल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. नगराध्यक्ष पद खुले आहे की राखीव आहे याचे ठोस उत्तर नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नसून त्यांनी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. यासंबंधीचे मार्गदर्शन राज्य सरकारने करावे, अशी भूमिका या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
२०१२ सालच्या शासकीय राजपत्राचा विचार केल्यास बदलापूर नगरपालिकेचे पहिल्या अडीच वर्षांचे आरक्षण हे आता खुले म्हणून वापरावे लागेल; परंतु १० एप्रिल २०१५ रोजी नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी काढलेल्या सोडतीप्रमाणे हे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित केल्याचे समजते आहे. या सोडतीच्या इतिवृत्ताची प्रत सध्या काही सोशल मीडियावरून प्रसारित होत असल्याचे चित्र आहे. याबाबतचे कोणतेही राजपत्र बदलापूर पालिकेला अद्याप प्राप्त झाले नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून अधिकृतरीत्या पालिकेत याबाबतचे पत्र येत नाही तोवर नगराध्यक्षपद खुले की आरक्षित हा प्रश्न कायम राहणार आहे.

‘शिंदेकृपा’ कोणावर?
बहुमताचा आकडा गाठलेल्या शिवसेनेला नगराध्यक्ष पद हे जर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यास अनुसूचित जातीमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये निवडून आलेले नगरसेवक प्रियेश जाधव, प्रभाग क्रमांक १८ मधील सोनिया ढमढेरे, प्रभाग क्रमांक ३५ मधील विजया राऊत, प्रभाग क्रमांक ४६ मध्ये प्रतिभा गोरे या नावांची या पदासाठी चर्चा आहे. नवनिर्वाचित नगरसेवक प्रियेश जाधव यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असले तरी आरक्षण नेमके कुठले यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. आरक्षण खुले असल्यास नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार वामन म्हात्रे यांची निवड या पदासाठी निश्चित मानली जात आहे. आरक्षण कोणतेही असले तरी ‘शिंदेकृपा’ ही म्हात्रेंच्या सल्ल्यानेच होणार, अशीच चर्चा शिवसेनेत होत आहे.